तिस-या पर्वात लागणार खरी कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 12:35 PM2020-05-03T12:35:58+5:302020-05-03T13:11:44+5:30

रेड झोनमधून बाहेर पडण्याचे जळगाव, धुळ्यापुढे आव्हान, मजूर परतू लागल्याने नंदुरबारपुढे आॅरेंज झोन टिकविण्याची कसोटी, निर्बंध आणि शिथिलीकरणाच्या पेचात अडकले प्रशासन

The real test will be in the third mountain | तिस-या पर्वात लागणार खरी कसोटी

तिस-या पर्वात लागणार खरी कसोटी

Next

मिलिंद कुलकर्णी

लॉकडाऊनचे तिसरे पर्व सुरु झाले. ४० दिवस घरात अडकून पडलेल्या नागरिकांना दिलासादायक बातमी सध्या तरी नाही. उलट प्रकोप वाढत चालला आहे. खान्देशचा विचार केला तर जळगाव आणि धुळे हे जिल्हे ‘रेड झोन’मध्ये समाविष्ट झाले आहेत. नंदुरबार सध्या आॅरेंज झोनमध्ये असला  तरी आता मध्य प्रदेश आणि गुजरातमधून स्थानिक रहिवासी परत येऊ लागल्याने या झोनचे अस्तित्व कसे राहते, हे बघायला हवे.
खान्देशातील बाधित रुग्णांची संख्या शंभरीपर्यंत भिडली आहे. त्यापैकी १९ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मृत्यू दर अधिक असल्याची आरोग्य क्षेत्रातील मंडळींची तक्रार आहे. मुंबई, पुणे आणि मालेगाव येथून आलेल्या रहिवाशांमुळे खान्देशात कोरोनाची बाधा अधिक झाली.  २५ मार्चपासून लॉक डाऊन पाळले जात असताना जिल्हाबंदी कठोरपणे अंमलात आणली नाही. त्याचा फटका बसला. सामान्य आजाराच्या रुग्णांना तपासणारे दोन-तीन डॉक्टर बाधित झाले. मालेगावला बंदोबस्तासाठी गेलेले पोलीस कर्मचारी बाधित झाले. याचा अर्थ सरळ आहे, पुरेशी खबरदारी बाळगली गेली नाही. सुरक्षा उपकरणे दिली गेली नसावी किंवा असतील तर ती वापरली गेली नाहीत. बेपर्वाई जीवावर बेतू शकते, हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे.
लॉकडाऊनचे तिसरे पर्व नागरिकांच्या संयम आणि सहनशिलतेची कसोटी पाहणारे राहील. या काळात जो काळजी घेईल, तो कोरोनावर मात करेल. महागाईने कळस गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवू लागली आहे. दुकानात गेले आणि वस्तू मिळाली असे आता होत नाही. अमूक नाहीये, ते शिल्लक नाही, असा सार्वत्रिक अनुभव आहे. यातून त्रस्तता वाढेल. स्वस्त धान्य दुकानातून केशरी पत्रिकाधारकांना धान्य मिळत आहे. पण त्यासाठी आधार लिंक वगैरे विषय आहेत. दुकानात गेल्यावर नियम सांगितले जातात. तहसील कार्यालयात अपुºया मनुष्यबळामुळे दादपुकार घेतली जात नाही. हे आणखी वाढत जाईल.
जिल्हा प्रशासनावरील कामाचा ताण आणखी वाढणार आहे. परराज्यातील मजुरांना परत पाठविण्याचा निर्णय झाल्यानंतर लगेच परवान्यासाठी गर्दी झाली. आरोग्य तपासणी करुन कुणालाही परत पाठवता येणार नाही किंवा जिल्ह्यात घेता येणार नाही. नियमित रुग्णांच्या तपासणीसोबत आता या मजुरांच्या, प्रवासी व्यक्तींच्या तपासणीचा ताण वाढणार आहे.
अन्नधान्य, भोजन पाकिटे, मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू पुरविण्यासाठी ४० दिवस स्वयंसेवी, सामाजिक संस्था अखंडपणे झटत आहेत. त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आता समाज आणि प्रशासन अशा दोघांची आहे. अपेक्षा वाढणार आहे, त्यासोबत देणाºयाचे हात देखील वाढायला हवे. तरच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी तिसºयांदा वाढला. कोरोनाच्या दहशतीसोबत जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, महागाईचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मजुरांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आता विद्यार्थ्यांचा प्रश्न उरला.
शैक्षणिक क्षेत्रासाठी काय तोडगा निघतो
याकडे समस्त विद्यार्थी आणि पालकवर्गाचे लक्ष लागले आहे. प्राथमिक विभागाचा प्रश्न नाही, पण माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन परीक्षांसंबंधी काय निर्णय होतो आणि त्याची अंमलबजावणी कशी होते, हे बघायला हवे. आॅनलाईन की आॅफलाईन हा प्रश्न जसा आहे, तसेच शारीरिक दूरत्व, यातायात सेवा हे सगळे सांभाळावे लागणार आहेच. 

Web Title: The real test will be in the third mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.