सो़डून दिलेली शिष्यवृत्ती परत मिळवता येणार; ३० जूनपर्यंत मुदत
By अमित महाबळ | Published: June 23, 2024 09:30 PM2024-06-23T21:30:53+5:302024-06-23T21:32:00+5:30
३० जून २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अमित महाबळ, जळगाव : शिक्षणातशिष्यवृत्तीचा आधार असतो मात्र, नजरचुकीने अथवा काही कारणांनी हा लाभ कायमस्वरुपी थांबविण्याचा किंवा सोडून देण्याचा पर्याय गेल्या वर्षात काही विद्यार्थ्यांकडून स्वीकारला गेला होता. यावर्षी ही चूक दुरुस्त करण्याची संधी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ३० जून २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षासाठी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करणे सुरू आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ‘राइट टू गिव्ह अप’चा टॅब नव्याने उपलब्ध करून देण्यात आला होता. शिष्यवृत्तीचा लाभ कायमस्वरुपी थांबविणे किंवा सोडून देण्यासाठी हा टॅब वापरायचा होता. मात्र, नजरचुकीने अनेकांनी त्याचा वापर केल्याच्या तक्रारी नंतर विद्यार्थ्यांनी व वेगवेगळ्या संघटनांनी केल्या होत्या. याची दखल घेत शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करून घेण्याची सुविधा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने उपलब्ध करून दिली आहे. नजरचुकीने ‘राइट टू गिव्ह अप’चा पर्याय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा. त्यांच्या अर्जांवरील कार्यवाही प्राचार्यांच्या लॉग इनमधून होणार आहे. त्यासाठी दि. ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मुदतीत अर्ज सादर करा...
नजरचुकीने ‘राइट टू गिव्ह अप’चा पर्याय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना आपली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करून घेण्याची संधी आहे. त्यासाठी ३० जूनची मुदत आहे. यासंदर्भात काही अडचण असल्यास सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, महाबळ कॉलनी रस्ता या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.