दर्जेदार आरोग्य सेवेची माफक अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:48 PM2018-10-26T12:48:21+5:302018-10-26T13:29:45+5:30
जळगावात वैद्यकीय संकूल उभारणीसह स्वतंत्र महिला रुग्णालय
विजयकुमार सैतवाल
जळगावात वैद्यकीय संकूल उभारणीसह स्वतंत्र महिला रुग्णालय उभे राहत असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेल्या जळगाव जिल्हावासीयांना आता दर्जेदार आरोग्य सेवेची माफक अपेक्षा आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून केली जात आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगावातील जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे, सुविधांचा अभाव यासह वेगवेगळ््या कारणांनी येथे आरोग्य सेवेबाबत नेहमी ओरड होते. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांचीही बिकट स्थिती आहे. त्यामुळे आरोग्य सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली जाते.
त्यानंतर आता जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याने येथे विविध पॅथींची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सोबतच मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला रुग्णालय आकाराला येत आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडून येत असल्याने आरोग्य सेवेत सुधारणा होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जळगावात वैद्यकीय संकुलास मंजुरी मिळण्यासह महिला रूग्णालयाच्या कामालाही गती मिळाली असल्याने महिला रुग्णांची सोय होणार आहे. मेडीकल हब हे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. तर हे महिला रूग्णालय आरोग्य विभागाच्या म्हणजेच जिल्हा रूग्णालयाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. रूग्णालयाचे एकूण अंदाजपत्रक सुमारे ५० कोटींचे आहे. पहिल्या टप्प्यात रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून दुसºया टप्प्यात कर्मचारी निवासस्थानांचे काम केले जाणार आहे.
एकूणच आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यावतीने मोठी सुविधा उपलब्ध होत असली तरी ती लवकर मार्गी लागून दर्जेदार सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.