विद्रोही मात्र चिंतनीय कवितांनी केले सर्वांना अंतर्मुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:11+5:302021-04-13T04:15:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित ऑनलाईन कविसंमेलनात सोमवारी सादर झालेल्या विद्रोही मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित ऑनलाईन कविसंमेलनात सोमवारी सादर झालेल्या विद्रोही मात्र चिंतनीय कवितांनी सर्वांना अंतर्मुख केले.
विद्यापीठातील फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, विचारधारा प्रशाळेअंतर्गत बुद्धिस्ट अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, महात्मा जोतिबा फुले अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मागासवर्गीय कर्मचारी संघटना (क.ब.चौ.उ.म.वि.) यांच्या संयुक्तपणे ११ ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करीत आहेत. सोमवारी विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कविसंमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे होत्या तर या संमेलनात निमंत्रित कवी म्हणून गझलकार मुकुंद राजपंखे, ख्वाडा, बबन चित्रपटाचे गीतकार कवी विनायक पवार, कवी सुदाम राठोड, कवी सुनील उबाळे यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण केले. कविसंमेलनाची सुरुवात कवी सुनील उबाळे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कवितेने सुरुवात केली.
या विद्रोही कविसंमेलनात प्रा. म. सु. पगारे यांनी आपली महात्मा फुले यांच्या जीवन व कार्याचा वैचारिक आशय व्यक्त करणाऱ्या क्रांतिबा कवितेचे सादरीकरण केले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन व परिचय दीपक खरात यांनी केले तर दीपक सोनवणे यांनी आभार मानले.
चांदण्याची छाया, कापराची काया...
दुपारी २ वाजता शाहीर चरण जाधव यांच्या शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर चरण जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात बासरीवादन करून केली. सुरुवात वामनदादा कर्डक यांचे ‘चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया’ या गीताने केली. शाहीर प्रताप सिंग बोदडे यांचे ‘दोनच राजे इथे गाजले, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर’ हे गीत सादर केले. सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार कृष्णा संदनशिव यांनी मानले.