भरड धान्य खरेदी आदेश प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 10:35 PM2021-06-07T22:35:08+5:302021-06-07T22:35:50+5:30
शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर भरड धान्य खरेदीचे आदेश प्राप्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर भरड धान्य खरेदीचे आदेश प्राप्त झाले असून त्यामुळे थाळीनाद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
शेतकरी संघटनेने वेळोवेळी निवेदन देऊन शासनाला भरड धान्य खरेदी केंद्र चालू करण्यासाठी प्रयत्न करत होती. भरड धान्याची नोंदणी होऊन तीन महिने होत आले होते. शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी शेतााची मशागत करण्यासाठी व रासायनिक खते घेण्यासाठी पैशांची खूपच चणचण असताना शासन भरडधान्य नोंदणी करूनही शेतमाल घेतला जाईल, याची शाश्वती नव्हती. जिल्हाभरातील शेतकरी या आदेशामुळे हवालदिल झाले होते. त्याचवेळी शेतकरी संघटनेने पुढाकार घेऊन तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली होती. मात्र शेवटी भरडधान्य खरेदीचे आदेश पालकमंत्र्यांनी आणावे अन्यथा आम्ही पालकमंत्र्यांच्या घरासमोर थाली बजाव आंदोलन करण्याच्या अल्टिमेटम शेतकरी संघटनेने दिला होता.
पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी याची दखल घेत शासनाकडे पाठपुरावा करून भरड धान्य खरेदी करण्याचे आदेश आणले. त्यात ज्वारी खरेदीचे आदेश मार्केट फेडरेशन यांच्याकडे आलेले आहेत. तरी मक्याचे खरेदी करण्याचे आदेश लवकरच प्राप्त होतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिली. म्हणून थाली बजाव आंदोलन स्थगित करण्यात आले.
तसेच भरड धान्य खरेदी सोबतच इतर विषयांचेही निवेदन पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जळगाव जिल्हा केळी क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात यावा. त्यासोबत जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी कापूस पीक विमा काढलेला आहे. कापूस या पिकाचे बोंडअळीने ८० टक्के नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना बिघ्याला तीन क्विंटल कापूस पिकलेला आहे. ही बाब जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. याकरिता कापूस उत्पादकांना पीक विमा चे संरक्षण कवच म्हणून नुकसान भरपाई मिळावी, अशी चर्चा शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी केली. त्यासोबतच कांदा बियाण्याच्या उत्पादक कंपन्यांनी कांदा बियाण्याच्या किमतींवर निर्बंध आणावा, अशी मागणीही शेतकरी संघटनेने केली आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष संजय महाजन, उपजिल्हाध्यक्ष किरण गुजर, सचिन शिंपी, नामदेव महाजन, अखिलेश पाटील, खुशाल सोनवणे, मंगेश राजपूत, नंदलाल पाटील, सय्यद देशमुख, सुनिल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाकडून भरड धान्य खरेदीमध्ये ज्वारीची खरेदी करण्याचे आदेश आणले आहेत. मात्र मका खरेदी करण्याचे आदेश लवकरच अाणू अशी चर्चा झाल्यामुळे पालकमंत्र्यांच्या घरासमोर खाली बजाव आंदोलन स्थगित करण्यात येत आहे
-संदीप आधार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष,
शेतकरी संघटना, जळगाव