कोविशिल्डचे ११ हजार डोस प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:49+5:302021-05-08T04:16:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस जळगावला शुक्रवारी प्राप्त झाले आहेत. या डोसमधून ४५ वर्षांवरील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस जळगावला शुक्रवारी प्राप्त झाले आहेत. या डोसमधून ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण होणार आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत कोव्हॅक्सिनचे ४५ वर्षांवरील नागरिकांसाठीही डोस येणार असल्याने दुसरा डोस बाकी असलेल्यांनी घाबरून न जाता संयम ठेवावा, असे आवाहन माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी केले आहे.
शहरासह जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर उसळणारी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा या गोष्टी बघता या ठिकाणी अखेर बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. केंद्रांवर होमगार्ड किंवा पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व गर्दी टाळण्यासंदर्भात, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासंदर्भात, मास्क परिधान करण्यासंदर्भात संबधितांना सूचना देण्यात याव्यात, असे सूचित करण्यात आले आहे.
ती कोव्हॅक्सिन केवळ १८ ते ४४ वयोगटासाठी
बुधवारी प्राप्त झालेले कोव्हॅक्सिनचे १२ हजार डोस हे केवळ १८ ते ४४ वयोगटासाठीच आहेत. हे डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी नाहीत, त्यासाठी येत्या दोन दिवसांत डोस उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, कोविशिल्ड लसीचे आलेले ११ हजार डोस हे ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी राखीव असल्याचे डॉ. समाधान वाघ यांनी सांगितले.
शहरातील केंद्रांवर गर्दी
शहरातील काही केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरू राहत आहे, तर काही केंद्रांवर सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी उसळली होती. यात शिवाजीनगरातील डी.बी. जैन रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. १८ ते ४४ वयोगटासाठी केंद्र निवडणे हे अत्यंत कठीण जात असून याबाबतच्या तक्रारी समोर येत आहेत. शासनाकडून देण्यात आलेल्या वेळेत साइट सुरू करण्याआधीच केंद्र बुक होत असल्याने नोंदणी करायची कशी, असा प्रश्न तरुणांसमोर पडला आहे. प्रशासनाने यावर काही तरी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.