सभासद संस्था प्रतिनिधींचे ८५२ ठराव आतापर्यंत प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:52 PM2020-01-23T12:52:05+5:302020-01-23T12:52:21+5:30
जिल्हा बँक निवडणूक : सोयीचे ठराव करण्यासाठी डावपेच सुरू
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित या संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या (संचालक मंडळ) निवडणुकीसाठी ३१ जानेवारीपर्यंत सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविले असून आतापर्यंत ८५२ ठराव प्राप्त झाले आहेत. सोयीचे ठराव करण्याचे डावपेच इच्छुकांकडून सुरू असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित या संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या (संचालक मंडळ) निवडणुकीसाठी सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव महाराष्टÑ सहकारी संस्था निवडणूक (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील नियम क्र.९ व १० अन्वये मागविण्यात आले आहेत. आधी १८ डिसेंबर २०१९ ते १६ जानेवारी २०२० या कालावधीत हे ठराव मागविण्यात आले होते. मात्र आता ती मुदत वाढवून ३१ जानेवारी २०२० करण्यात आली आहे. सर्व संस्थांकडून ठराव प्राप्त झाल्यानंतर ६ मे २०२० या दिनांकावर मतदार यादी निश्चित केली जाणार आहे.
२९५२ पैकी ८५२ ठराव प्राप्त
जिल्हा बँकेच्या सभासद संस्थांमध्ये ८७६ विकासो, तर २१०० इतर संस्थांचा समावेश आहे. त्यापैकी आतापर्यंत ८५२ संस्थांचे ठराव सहकार विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यात विकासोचे ३९९ तर इतर संस्थांचे ४५३ ठराव आहेत.