अन्योन्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:51 PM2018-09-03T15:51:51+5:302018-09-03T15:52:10+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’साठी ‘रंग प्रेमाचे’ या सदरात साहित्यिक डॉ.उल्हास कडूसकर लिहिताहेत...

Reciprocity! | अन्योन्य!

अन्योन्य!

Next

प्रिय सुभाष,
हे लिहितानासुद्धा कसेतरीच वाटते आहे. ‘अहो’खेरीज दुसऱ्या नावाने कधी हाक मारली नाही. घरच्या कार्यातच फक्त ‘नाव’ घेण्याचा प्रसंग येतो. त्यामुळेच इथे कागदावर लिहायचे म्हणूनच हातातून (लेखणीतून) नाव उतरले. लिहिताना हात थोडासा थरथरला, शहारला, पण नंतर मोहरला. माझी मलाच गंमत वाटली. जुन्या चालीरीतींन्चा किती पगडा असतो ना आपल्यावर? आता हेच बघा ना, १ आॅक्टोबर आपल्या लग्नाचा वाढदिवस. दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला तुम्हीच मला गिफ्ट द्यायची. सगळेजण विचारणार, ‘काय ग? या वर्षी काय मिळालं? काहीतरी चांगले घसघशीत वसूल करून घे!’ घरातलेदेखील किंवा बाहेरचेसुध्दा. मला नेहमीच हा प्रश्न पडतो असे का? तुम्ही मात्र दरवर्षी न विसरता आदल्या दिवशीच छानपैकी साडी घेता. त्यामुळे इतर जणींसारखा मागण्याचा किंवा हट्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. तुमची निवडही इतकी छान असते की अगदी पुण्याच्या मोठ्या प्रसिद्ध साड्यांच्या दुकानात बाहेर उभी असताना (मैत्रिणी आतमध्ये साडी बदलून घ्यायला गेल्या होत्या) तेव्हा ४-५ जणींनी ‘अहो, एवढी छान साडी तुम्ही कुठून घेतली हो,’ असे विचारत होत्या.
यावर्षी मात्र मी तुम्हाला काहीतरी द्यायचे असे ठरवले होते. काय आणायचं? काय द्यायचं. काहीच कळेना. शेवटी मुद्दाम करून घेतलेले चांदीचे मंगळसूत्र विकून टाकायचं ठरवलं आणि तुमचा मोबाइल अलिकडे सारखा दुरुस्तीला टाकावा लागतो. सारखा चार्ज करावा लागतो हे पहात होते म्हणून थोडेसे वरचे पैसे घालून हा माझ्या कुवतीनुसार मोबाइल घेतला आहे. आता पूर्वीपेक्षा किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या असणाºया मॉडेलचा मोबाइल घेतला आहे, बघा हं, तुम्हाला आवडतो का? माझी छोटीशी प्रेमाची भेट ! आणि वस्तूमधून थोडीच प्रेमाची किंमत होते? भेट जरी ‘मोबाइल’ची असली तरी अस्सल प्रेम हे अविचल, फिक्स्ड आहे हं- कधीच न हलणार! खरं आहे ना? धाडस करून लिहितेय- माझ्या राजा ! आपल्या विवाह वर्धापन दिनाच्या कित्येक न संपणाºया शुभेच्छा... शुभेच्छा...!
तुमची सुनीता
प्रियतमा (डार्लिंग) सुनीता हिस,
स्वप्नामध्ये जे म्हणत असतो, कारण प्रत्यक्ष उच्चारण्याचा धीर होत नाही. ते आज इथे लिहित आहे. असले काही बोलणे दूरच, नावाने हाक मारणेदेखील कधी केले नाही पहिल्यापासूनच- का कुणास ठावूक? इतकेच काय? निम्म्या वेळा तर ‘तुम्हाला काय हवे? तुम्हाला काय वाटते?’ असेच म्हणत गेलो. सवयच पडली तशी. पती-पत्नीच्या नात्याचा म्हणजे प्रेमाचा ‘शो’ नको असले, पूर्वापार मनावर बिंबलेले त्याचा परिणाम असेल. तसेच आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचासुध्दा ‘बभ्रा’ नको असेच वाटायचे. पण आता काळ बदललाय. आपल्या लक्षात नसले तरी लोक आठवण करून देतात.
१ आॅक्टोबर लग्नाचा वाढदिवस- बायकांच्या अगदी पक्का लक्षात असतो आणि नवरे बहुदा विसरतात, असा एक (गैर)समज ! पण नेहमीप्रमाणे तुला आदल्या दिवशी भेट न देता थोडा सस्पेन्स निर्माण करणार आहे, कदाचित मी नक्की विसरून गेलो असेही वाटेल, पण ते शक्य आहे का? तुझ्याशी विवाह झाल्यानंतर तू खºया अर्थाने माझी गृहिणी, सुगृहिणी एवढेच नाही तर गृहस्वामिनी झालीस आणि माझ्या ‘गृहस्थ’पणाला घरगृहस्थीला सुबक आकार दिलास. आहे त्यात आणि जे मिळेल तेवढ्यात टुकीने संसार केलास, करीत आहेस. संध्याकाळी घरी आल्यानंतर हसत स्वागत करणे नेमाने केलेस. खरे म्हणजे दिवसभर राबून शरीर आंबलेल्या अशा तुझीच मी आल्याबरोबर हसत- निदान स्मितहास्याने दखल घ्यायला पाहिजे, पण आम्ही आपले येतो बºयाच वेळा कपाळाला आठ्या घालीत. निदान तुझ्या दिसण्याला कधी दाद द्यायची तर तेही कधी जमले नाही. फक्त आरशामध्ये पाहात तू काही साडी ठाकठीक करीत असताना पाठीमागे उभा राहून फक्त बोटांनीच ‘वा ! छान’’ अशी फक्त खूण केली असेल तेवढीच.
परवा तुमच्या भिशीला जाताना तुझे ते जुनेच चांदीचे मंगळसूत्र कळकटलेले पाहिले आणि वाईट वाटले. मग माझा कंपनीने दिलेला महागातला मोबाइल थोडक्यात दुरुस्त झाला. तोच विकून टाकला, आता एक साधासा मोबाइल घेईन एक-दोन दिवसात. पण त्या पैशातून वर थोडी भर घालून तुझ्यासाठी नवीन एक ग्रॅमचे मंगळसूत्र घेतले आहे. मला खात्री आहे ते तुला आवडेल आणि जशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण असे म्हणतो तसे. दहा ग्रॅमच्या मंगळसूत्राच्या जागी हे एक ग्रॅमचे मंगळसूत्र तू साजरे मानून घेशील. घेशील ना? सध्या आपल्या कुवतीला झेपेल तेवढेच. मध्यमवर्गीय प्रपंचामध्ये हे असेच चालायचे. हे तूच मला नेहमी समजावून सांगतेस. हा एक गोष्ट मात्र नक्की- किती ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आहे-किती का असेना पण त्या मागचे प्रेम मात्र चोवीस कॅरटचे आहे- शुध्द चोवीस कॅरटचे ! तुझ्या गळ्यात त्याची झळाळी तशीच दिसेल हो ना राणी? तुझाच, - सुभाष

-डॉ.उल्हास कडूसकर, जळगाव

Web Title: Reciprocity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.