जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:22 PM2018-05-11T13:22:14+5:302018-05-11T13:22:14+5:30
निधीही मंजूर
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ११ - जळगाव येथे चिंचोली शिवारात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्यावतीने मान्यता देण्यात आली असून त्यासाठी १९१ कोटी ९० लाख २४ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात १० मे रोजी निर्णय घेण्यात आला असून निविदा प्रक्रि येनंतर बांधकामास सुरुवात होणार आहे.
जळगाव येथे वैद्यकीय संकूल (मेडीकल हब) उभारणीसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी मान्यता दिली. त्यानुसार जळगाव-औरंगाबाद मार्गावर जळगावपासून ५ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे हे संकुल उभारले जाणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथी, भौतिकोपचारशास्र आणि दंत्त महाविद्यालय उभारण्यात येईल. या संकुलामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल. तसेच १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय या मेडिकल हबमध्ये असेल. चिंचोली शिवारातील ही जागा गेल्या महिन्यातच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाली होती.
तूर्त हे महाविद्यालय जिल्हा रुग्णालयातपासून सुरू होणार असले तरी चिंचोली शिवारात बांधकामासाठी मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार १० मे रोजी शासन निर्णय होऊन या महाविद्यालयाच्या बांधकामास शासनाने मंजुरी दिली आहे.
निधी मंजूर
या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी २०८ कोटी ७९ लाख एवढी प्रस्तावित रक्कम आहे. त्यापैकी १९१ कोटी ९० लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून बांधकामास सुरूवात होईल, असे सांगण्यात आले.
द्वितीय व तृतीय वर्षाच्या कामासंबंधी घेतला आढावा
वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व त्रुटी दूर झाल्या असून एमसीआयच्या समितीने पाहणी केल्यानंतर आता मान्यता दिली. त्यामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होईल. - डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय. वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयापासून त्याची सुुरुवात होणार असून त्याचे काम येथे युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी १० मे रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाचे उप संचालक डॉ. तात्याराव लहाने हे येणार होते. मात्र ते काही कारणास्तव येऊ शकले नाही. मात्र तयारी संदर्भात अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. यामध्ये आॅगस्टमध्ये प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास सुरुवात होणार असून आता द्वितीय व तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालय झाले चकाचक
डॉ. तात्याराव लहाने हे पाहणी करण्यासाठी येणार असल्याने जिल्हा रुग्णालयात सकाळपासूनच स्वच्छता केली जात होती. यामध्ये परिसर स्वच्छ करण्यासह भींतीवरील टाईल्सही स्वच्छ करण्यात आल्या.
चिंचोली शिवारात उभारण्यात येणाºया वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास मान्यता मिळाली असून त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय.