अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यार्‍या रुग्णालयांची मान्यता होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:44+5:302021-04-13T04:14:44+5:30

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गच्या पार्श्वभूमीवर बेड उपलब्ध होत नसल्याने तसेच औषधोपचारात ज्यादा पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी ...

Recognition of hospitals charging Rs | अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यार्‍या रुग्णालयांची मान्यता होणार रद्द

अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यार्‍या रुग्णालयांची मान्यता होणार रद्द

Next

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गच्या पार्श्वभूमीवर बेड उपलब्ध होत नसल्याने तसेच औषधोपचारात ज्यादा पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा बिल घेतल्यास त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान, या विषयी तक्रारी येत असून ऑडिट करण्यासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे अधिकारात नसताना बाह्य रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिल्याने चार डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होत नाही तसेच अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांची फिरफिर सुरू आहे. यात अनेक रुग्णालयांकडून याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा बिल घेतले जाते. या प्रकाराला आळा बसावा म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे.

यामध्ये शासकीय दरानुसार रुग्णालयांनी बिले आकारावी, याविषयीचे फलक रूग्णालयात लावणे बंधनकारक असून ज्यादा बिल घेतल्यास रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिला आहे.

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिक धास्तावले आहेत असे असले तरी काही त्रास होत असताना अनेक जण रुग्णालयात जात नाही. मात्र प्रकृती अधिकच खालावली गेल्यानंतर ते उपचारासाठी धाव घेतात. यात ग्रामीण भागातील रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने ते शहरातील खासगी रुग्णालयांकडे धाव घेतात. मात्र या ठिकाणी ज्यादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ज्यादा बिल आकारू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- जिल्ह्यातील एकूण रुग्णालय - १२३

- बिलांबाबत तक्रार असल्याने रक्कम परत केलेले रुग्णालय - २

दोन रुग्णालयांनी परत केली रक्कम

यावर्षी जादा बिलाबाबत तक्रारी येत आहे. याविषयी ऑडिट केले जाणार आहे. मात्र गेल्या वर्षी देखील अशाच तक्रारी आल्याने ऑडिट झाल्यानंतर जादा रक्कम घेतल्याचे आढळून आल्याने दोन रुग्णालयांना वाढीव रक्कम परत करावी लागली होती.

ऑडिटरची नियुक्ती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांकडून ज्यादा बिलाची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने या रूग्णालयांच्या ऑडिट साठी ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तक्रार आलेल्या रुग्णालयांचे ऑडिट होणार आहे.

लेखी तक्रार नाही

बेड न मिळणे, ऑक्सिजन न मिळणे या व इतर अडचणी येत असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची फिरफिर होते. या नंतर रुग्णालयात जागा मिळाली तर त्याठिकाणी लाखो रुपये बिल आकारले जाते, असे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. मात्र याविषयी ते लेखी तक्रार करीत नाही.

कोट

शासकीय दरानुसार रुग्णालयांनी बिले आकारावे, यासंबंधी रूग्णालयात दर असलेले फलक लावावे, अतिरिक्त बिल आकारणार्‍या रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात येईल.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Recognition of hospitals charging Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.