उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पीएच.डीच्या सुधारित नियमावलीला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 08:55 PM2018-07-24T20:55:13+5:302018-07-24T20:56:41+5:30
पीएच.डी. मध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुधारीत मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. या मसुद्याला मंगळवार २४ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जळगाव : पीएच.डी. मध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुधारीत मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. या मसुद्याला मंगळवार २४ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नवीन मसुद्यात सुमारे २० नवीन मुद्यांचा समावेश आहे.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विद्या परिषदेची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून मान्यता देण्यात आली. पीएच.डी. मध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालावर विद्या परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली समितीने सुचविलेल्या सुधारीत मसुद्याला मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता एखाद्या संशोधक विद्यार्थ्याने सलग दोन सहामाही प्रगती अहवाल जमा केले नसतील तर त्याला पत्र देण्यात येईल. त्यानंतरही संबंधित विद्यार्थ्याने सलग तीन सहामाही प्रगती अहवाल जमा केले नाहीत तर विद्यार्थ्याच्या मार्गदर्शकाला पत्र देवून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचा पीएच.डी साठीचा प्रवेश प्र-कुलगुरुंच्या मान्यतेने रद्द करण्यात येईल. एखाद्या संशोधक विद्यार्थ्याच्या संशोधनाच्या संक्षिप्त रुपरेषेमध्ये आरआरसी समितीने दुरुस्ती सुचविल्यानंतर विद्यार्थ्याने दुरुस्त केलेली संक्षिप्त रुपरेषा पुन्हा आरआरसीच्या सभेत मंजूरीसाठी ठेवण्याची आवश्यकता नाही. त्या-त्या विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांना संशोधन विभागाकडून दाखविण्यात येईल व त्यांची मंजूरी घेण्यात येईल. विद्यार्थ्याला ज्या तारखेला मार्गदर्शक देण्यात आला आहे तिच तारीख पीएच.डी नोंदणीची तारीख असेल. अशा जवळपास २० मुद्यांचा समावेश या नव्या मसुद्यात करण्यात आला आहे.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी चॉईस बेसड् क्रेडिट सिस्टीमबाबत जिल्हावार प्राध्यापकांच्या कार्यशाळा घेतल्या जातील. कोणत्याही प्राध्यापकांचा वर्कलोड कमी होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी माहिती दिली.
बैठकीत विद्यापीठाचे सर्व निकाल निर्धारित कालावधीच्या आत व चांगले लागल्याबद्दल तसेच विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणाच्या निवडणूका इतर विद्यापीठांच्या आधी शांततेत व पारदर्शीपणे पार पडल्याबद्दल कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक आणि प्रशासनाचे अभिनंदन करणारा ठराव प्राचार्य एस.आर.जाधव यांनी मांडला. या ठरावाला प्राचार्य प्रमोद पवार यांनी अनुमोदन दिले. विद्या परिषदेने हा ठराव एकमताने मान्य केला. कुलसचिव भ.भा.पाटील यांनी आभार मानले.