जळगावातील पाणीपट्टीकरात प्रशासनाकडून वाढीची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 04:51 PM2018-02-14T16:51:21+5:302018-02-14T16:56:50+5:30
७४६ कोटीचा अर्थसंकल्प स्थायी सभापतींकडे सादर करीत तरतुदींच्या अभ्यासासाठी सभा तहकुब
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१४ :महानगरपालिकेचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे जमा-खर्च आणि २०१८-१९ या वित्तीय वर्षासाठी ७४६ कोटी २ लाख १० हजार रुपयाचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी बुधवारी स्थायी समिती सभापतींकडे सादर केला. प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीत वाढ प्रस्तावित केली. दरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत अभ्यास करण्यासाठी सभा तहकुब करण्यात आली.
मनपाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सभापती ज्योती इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली.
पाणीपट्टीकरात वाढीचे संकेत
अंदाजपत्रकात कुठलीही प्रत्यक्षात करवाढ करण्यात आली नसली तरी मालमत्ता करातील पाणीपुरवठा लाभ कर २ टक्क्यावरून ३ टक्के करण्यात आला आहे. तसेच पाणीपट्टी करात देखिल वाढ २० टक्के वाढ सुचविण्यात आली आहे.
२६ कोटी ३८ लाख शिल्लकीचा अर्थसंकल्प
महापालिकेचे २५६ कोटी १६ लाख, उत्पन्न १११ कोटी ३३ लाख, अनुदान तसेच मनपा निधी ४६ कोटी ३६ लाख, शासकीय निधी २८३ कोटी १७ लाख यासह आरंभी उत्पन्नाच्या ३० कोटी ९९ लाख शिल्लकेसह ७४६ कोटी २ लाख १० हजार रुपयाचा अर्थसंकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच जमा खर्चाच्या तरतुदीनुसार २६ कोटी ३८ लाख ९२ हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.