पाचोरा बाजार समितीत सूर्यफुलास विक्रमी भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 PM2021-03-13T16:18:31+5:302021-03-13T16:18:57+5:30
यंदा सूर्यफुलास विक्रमी असा प्रति क्विंटल रुपये ७ हजारचा भाव देऊन राज्यात उच्चांक गाठला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सूर्यफुलास विक्रमी असा प्रति क्विंटल रुपये ७ हजारचा भाव देऊन राज्यात उच्चांक गाठला आहे. यामुळे पाचोरा बाजार समिती आवारात जिल्हाभरातून व जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी गर्दी केली आहे.
पाचोरा बाजार समितीत सूर्यफूलास सहा ते सात हजार सरासरी भाव दिला जात असून शेतकरीवर्ग आनंद व्यक्त करीत आहेत. या बाजार समितीत नांदगाव चाळीसगाव, एरंडोल, चोपडा, अमळनेर, पारोळा, बोदवड, सोयगाव, सिल्लोड, जामनेर आदी भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात माल घेऊन येत असून सूर्यफुलाची प्रचंड आवक झाली आहे.
दररोज पाचोरा बाजार समितीत दररोज २ हजार क्विंटलपर्यंत सूर्यफुलाची खरेदी केली जात असून दररोज लीलाव होऊन शेतकऱ्यांना तातडीने पैसे दिल्या जात आहेत. यामुळे बाजार समिती शेतमालाला सुगीचे दिवस आले आहे. सूर्यफूल लिलावास सभापती सतीश शिंदे, उपसभापती विश्वासराव भोसले आवर्जून उपस्थित रहात आहेत.
पाचोरा बाजार समितीत कधी नव्हे, एवढा भाव यावर्षी शेतकऱ्यांना मिळत असून शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. व्यापारीदेखील चढ्या भावात लिलाव पद्धतीने मालाची खरेदी करीत असून सूर्यफूल चांगल्याप्रकारे असल्याने भाव दिला जात आहे.
-सतीश शिंदे , सभापती कृषी बाजार समिती, पाचोरा.
पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाचोरा बाजार समिती चांगल्याप्रकारे भाव मिळत आहे. येथे कोणत्या प्रकारची फसवणूक होत नाही. यावर्षी, दुप्पट भाव मिळाल्याने मी अत्यंत समाधानी आहे मला नऊ एकर शेतीमध्ये ७० क्विंटल सूर्यफुलाची उत्पन्न झाले असून यावर्षी विक्रमी भाव सात हजारापर्यंत मिळाला आहे.
-दगा पंडित पाटील, शेतकरी पिंपरी, प्र. उ. ता. पारोळा
मी धुळे जिल्ह्यातील शेतकरी असून पाचोरा बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्याने लांबून आलेलो आहे. मला याठिकाणी सात हजारापर्यंत मी समाधानी आहे.
-जितेंद्र संतोष पाटील, शेतकरी, रा. अजाण, ता. जि. धुळे
आमच्या कारकिर्दीत शेतमालाला चांगल्याप्रकारे भाव मिळत असून आम्ही बाजार समितीवर बारकाईने लक्ष ठेऊन शेतकरी व्यापारी यांच्यात समन्वय रहात आहे.
-विश्वासराव भोसले.