सेंद्रीय हळद आणि गोड मक्यापासून घेतले विक्रमी उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:30 PM2019-07-01T12:30:26+5:302019-07-01T12:32:01+5:30
कृषीभूषण राजेश पाटील यांचा उपक्रम : जळके येथे शेतीत यशस्वी प्रयोग, पांरपारिक पीक पध्दतीला फाटा
सुनील पाटील
जळगाव : पारंपारिक पीक पध्दतीला फाटा देत सेंद्रीय पध्दतीची शेती करुन जळके (ता.जळगाव) येथील शेतकरी कृषीभूषण राजेश पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सेंद्रीय हळद, पपईसोबत गोड मधू मका या पिकांचे विक्रमी उत्पादन राजेश पाटील यांनी घेतले असून सेंद्रीय शेतीमुळे त्यांना राज्य शासनाने कृषीभूषण पुरस्कारानेही गौरविले आहे.
राजेश पाटील यांच्याकडे स्वत:ची ६० एकर तर कराराची ४५ एकर अशी एकूण १०५ एकर शेती आहे. पाटील यांचा नेहमीच पांरपारिक पीक पध्दतीला फाटा देत नवीन पध्दत अवलंबण्याकडे कल असतो. रासायनिक पिकांचा आरोग्यावर होणार दुष्पपरिणाम पाहता त्यांनी सेंद्रीय शेतीचा पर्याय निवडला.डाळींब, पपई आणि हळद हे तीन पीके त्यांनी सेंद्रीय पध्दतीने लागवड करुन विक्रमी उत्पादन घेतले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल कृषी विभागाने घेतली. २००६ मध्ये तत्कालिन राज्यपाल, मुख्यमंत्री विलासराव देशमुख व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते त्यांना नागपूर येथे कृषीभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. २००३ पासून ते सेंद्रीय हळदीचे उत्पादन घेत आहेत.
योग्य नियोजन करुन संयम राखणे आवश्यक
आदर्श शेतकरी व कमी खर्चात विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असेल तर शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करुन संयम राखणे आवश्यक आहे. उत्पादीत झालेल्या मालाला भाव नसेल तर त्याची साठवण करुन मागणीच्या वेळी पीक विक्रीला काढले तर चांगला भाव मिळतो. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. सेंद्रीय हळद व गोड मधू मक्याचे उत्पादन घेणारे राजेश पाटील हे तालुक्यातील पहिले शेतकरी आहेत. सद्यस्थितीत त्यांनी साडे चार एकरात गोड मक्याची लागवड केली असून तितक्यात एकरात हळदीची लागवड केली आहे. कोरडी झाल्यानंतरच हळद बाजारात विक्री काढली तर उत्तम भाव मिळतो असे पाटील यांचे म्हणणे आहे. पाटील यांनी ३० एकर सेंद्रीय उसाची लागवड करुन स्वत:च गुळ निर्मिती केली होती.