सातपुड्यात ‘दुपर्णी चिरायता’ दुर्मीळ वनस्पतीची नोंद; महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 05:21 AM2019-12-02T05:21:17+5:302019-12-02T08:14:00+5:30
‘दुपर्णी चिरायता’ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘चीरायीता बायफोलीया’ असे आहे.
- अजय पाटील
जळगाव : जैवविविधतेने समृद्ध सातपुडा पर्वतरांगामध्ये अत्यंत दुर्मिळ वनस्पतींची नोंद आतापर्यंत झाली आहे. आता या जंगलात ‘दुपर्णी चिरायता’ ही दुर्मिळ वनस्पती आढळून आली आहे, असा दावा इकरा एच. जे. थीम महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. तन्वीर खान यांनी केला आहे.
‘दुपर्णी चिरायता’ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘चीरायीता बायफोलीया’ असे आहे. जगामध्ये चिरायतीच्या ७७ प्रजाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये केवळ नऊ प्रजाती असून, महाराष्टÑात पहिल्यांदाच या वनस्पतीची नोंद झाली आहे. ‘दुपर्णी चिरायता’ या वनस्पतीला एक लहान व एक मोठे असे दोन माने (फाटे) असतात. तसेच निळसर रंगाचे एक फुल असते. पर्वत शिखरांच्या उतारावरील ओलसर खडकाळ जागेवर ही वनस्पती आढळते.
भारतात सर्वप्रथम १८८४ मध्ये ब्रिटीश वनस्पती अभ्यासक क्लार्क यांनी पश्चिम बंगालच्या जंगलात ही वनस्पती शोधली. त्याचप्रमाणे २००८ मध्ये अरुणाचल प्रदेशातील ‘गिरी’ व १९९७ मध्ये मध्य भारतातील मुदगल या ठिकाणी चिरायतीची नोंद झाली आहे.
तोरणमाळ व अमलीबारी भागात आढळली वनस्पती
प्रा. डॉ. तन्वीर खान हे अभ्यासासाठी सातपुडा पर्वत रांगेत नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ व अमलीबारी येथे गेले असताना त्यांना ही वनस्पती आढळली. या वनस्पतीची माहिती डॉ. खान यांनी पुणे विद्यापीठाचे डॉ. मिलींद सरदेसाई व बीएसआय कोईमतूर येथील डॉ. राजीवकुमार सिंग यांना पाठविली. त्यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.
यासाठी डॉ. खान यांना डॉ. एम. बी. पाटील व अजहर शेख यांचे सहकार्य लाभले. या वनस्पतीवर डॉ. खान यांनी तयार केलेला शोधनिबंध ‘इंडियन फॉरेस्टर’ या विज्ञान पत्रिकेला पाठविण्यात आला आहे.
‘दुपर्णी चिरायता’ सारखी अत्यंत दुर्मिळ वनस्पती सातपुडा पर्वतरांगेत मिळणे ही महाराष्टÑासाठी अभिमानाची बाब आहे. या वनस्पतींचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष संवर्धन मोहीम राबविण्याची गरज आहे.
- डॉ. तन्वीर खान,
वनस्पती अभ्यासक, जळगाव.