नाकाबंदीच्या नावाखाली "मोजक्या" पोलिसांकडून वसुली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:28+5:302021-05-10T04:16:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यामुळे निर्माण झालेली धोकेदायक परिस्थिती, यामुळे शासनाने लाॅकडाऊन नाही, परंतु ...

Recovered from "few" police in the name of blockade! | नाकाबंदीच्या नावाखाली "मोजक्या" पोलिसांकडून वसुली !

नाकाबंदीच्या नावाखाली "मोजक्या" पोलिसांकडून वसुली !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यामुळे निर्माण झालेली धोकेदायक परिस्थिती, यामुळे शासनाने लाॅकडाऊन नाही, परंतु कडक निर्बंध लागू केले आहेत. रोजचा आकडा हजाराच्या आसपास आहे, तर मयतची संख्यादेखील १५ च्यावर आहे. असे असताना नागरिकांकडून या निर्बंधांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्याचा गैरफायदा फायदा घेत काही मोजक्या पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली वसुली केली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागलेल्या आहेत.

विशेषतः रोज सायंकाळी दोन तास कडक नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहेत. ही नाकाबंदी खरोखर होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी डॉ. मुंढे एक तास शहरात फेरफटका मारताना दिसून येत आहेत. त्यानंतर मात्र काही पोलीस वाहनधारकांकडून कारवाईच्या नावाखाली वसुली करीत आहेत. यात आरसीपी, पोलीस दलात नव्याने दाखल झालेले तरुण पोलीस सर्वात पुढे आहेत. वाहनधारकाकडे मास्क, वाहन परवाना नसला तर वाहन जप्त करुन दंडात्मक कारवाई व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून १८८ अन्वये कारवाईचा दम भरला जातो. वाहनधारक गयावया करायला लागला की, एक हजार रुपयांची मागणी केली जाते. ही रक्कम मिळाली तर आनंदच, पण वाहनधारक इतकी रक्कम देऊ शकत नसल्याचा अंदाज आल्यावर पाचशे व त्यानंतर शंभर व दोनशे रुपयांवरही प्रकरण मिटविले जाते.

...असे आहेत दोन किस्से

१) गेल्या आठवड्यात पांडे चौकात चारही बाजूंनी पोलीस तपासणी सुरु असताना गांधी उद्यानाकडून आलेल्या एका दुचाकीस्वार तरुणाला आरसीपीच्या तरुणांनी अडविले. या दुचाकीस्वाराकडे वाहन परवाना नव्हता. वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाईचा दम या पोलिसांकडून भरण्यात आला. दुचाकीस्वाराने विनंती केली असता एक हजार रुपयांची मागणी करण्यात आली. खिशात इतकी रक्कम नाही सांगितल्यावर पोलीस पाचशे रुपयावर आला. तितकेदेखील पैसे नसल्याचे दुचाकीस्वाराने सांगितले असता दोनशे रुपये तरी द्यावे लागतील, असे या पोलिसाने सांगितले, दरम्यान त्याचवेळी याच चौकात ओळखीचा सिनियर पोलीस दुचाकीस्वाराच्या नजरेस पडला. त्यांच्याकडे विनवणी केल्यावर दुचाकीस्वाराला सोडण्यात आले.

२) दोन दिवसांपूर्वी रामानंद नगर घाटाच्या खाली एका मोकळ्या जागेत काही तरुण मद्यप्राशन करीत असतानाच त्या ठिकाणी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी तेथे धडकले. या तरुणांना दम देत पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा कांगावा या पोलिसांनी केला. तेथेही तोच विनवणीचा कित्ता गिरविण्यात आला. शेवटी एक हजार रुपयात तंटा मिटविण्यात आला. या भागात रोज काही पोलीस असेच सावज शोधत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातदेखील तरुण पोलीस कर्मचारी होता.

Web Title: Recovered from "few" police in the name of blockade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.