शिक्षणाधिकाऱ्यांचे बनावट आदेश तयार करुन शिक्षक भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:49 PM2020-03-12T12:49:00+5:302020-03-12T12:49:33+5:30
पाचोरा येथील गिरणाई व धुळ्याच्या धनदाई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश
जळगाव : संस्थेत रिक्त जागा नसतानाही तेथे रिक्त जागा असल्याचे भासवून माध्यमिक शिक्षणाधिकाºयांच्या सहीचे बनावट आदेश तयार करुन शिक्षक व शिपाई पदाची भरती केल्याप्रकरणी पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित परशुराम शिंदे यांच्यासह सचिव व संचालक तसेच धनदाई माता एज्युकेशन सोसायटी मोहाडी (प्र.डांगरी) धुळे संस्थेचे दत्तात्रय दयाराम पाटील, वसंत तानकू पाटील यांच्यासह इतर संचालकांविरुध्द मंगळवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालिन शिक्षणाधिकारी देविदास पंडीत महाजन यांनी फिर्याद दिली आहे.
पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलिक आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा (वॉर्ड क्र.६) या शाळेत शासन निर्णयानुसार ८ पदे मंजूर होती व ही आठ पदे कार्यरत असताना संस्थेने मयूर किशोर महाजन, मिलिंद माधव सावळे, संगीता मनोहर सोनवणे, संदीप दिनकर पाटील, वैशाली पुरणदास राठोड यांची उपशिक्षक तर नितीन मिठाराम सोनवणे व निखील विकास नाईक यांची शिपाई म्हणून नियुक्ती केली. या नियुक्त्या करताना संस्थाध्यक्ष, सचिव, संचालक व मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची बनावट सही करुन १७ नोव्हेंबर २०१७ च्या रोजीचे नियुक्ती आदेश काढले. नंतर हे प्रकरणे शिक्षणाधिकाºयामार्फत उपसंचालक (नाशिक) येथे न पाठविता शालार्थ आयडी म्हणून हे प्रकरण मंजूर करुन घेतले.
अमळनेरला भरली चार पदे
धनदाई एज्युकेशन सोसायटी मोहाडी (प्र.डांगरी) ता.धुळे संचलित जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथे मंजूर पदे रिक्त नसताना रोहिदास प्रताप ठाकरे, प्रदीप लीलाधर धनगर, भाग्यश्री रामदास वानखेडे व दत्तू भगवान कोळी यांची शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती केली. येथेही संस्थेचे दत्तात्रय दयाराम पाटील, वसंत तानकु पाटील, संचालक व मुख्याध्यापकांनी बनावट आदेश तयार करुन या नियुक्त्या करुन शासन व उमेदवारांची फसवणूक केली. शिक्षणाधिकारी कार्यालयातील बारनिशीमध्ये या नियुक्त्यांच्या नोंदी कुठेच आढळून आल्या नाहीत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिक्षणाधिकारी महाजन यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, संचालक व मुख्याध्यापक यांच्याविरुध्द तक्रार दिली.