जळगाव जिल्ह्यात ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे रेड अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:18 AM2021-09-27T04:18:12+5:302021-09-27T04:18:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. अतिपावसाच्या इशाऱ्यासोबतच जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.
जिल्ह्यात यावर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाला होता; मात्र सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला असून, त्यात बंगालच्या उपसागरामुळे ७० टक्के पाऊस झाला आहे. आता एकीकडे परतीचा मान्सून सुरु होत असतानाच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ या चक्रीवादळामुळे आगामी तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंगळवारी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यापर्यंत परतीचा मान्सून कायम राहण्याचाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
रेड अलर्ट का दिला जातो ?
हवामान विभागाकडून पावसाच्या अंदाजानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला तैनात राहण्यासाठी अलर्ट जाहीर करण्यात येतात. ६४ मिमीपर्यंत पाऊस होणाऱ्या भागासाठी यलो अलर्ट दिला जातो. ६४ ते ११५ मिमी पाऊस होण्याचा अंदाज असलेल्या भागात ऑरेंज अलर्ट तर ११५ ते २०४ मिमी पाऊस होणाऱ्या भागात रेड अलर्ट दिला जातो. मंगळवारी जिल्ह्यात एकाचवेळी ११५ मिमीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याबरोबरच जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आदेश काढून, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकांना सतर्क राहण्याचे आदेश काढले आहेत.