चाळीसगावला सुरू झाली 'लाल कांद्याची' आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 11:31 PM2018-10-07T23:31:43+5:302018-10-07T23:33:30+5:30
बाजार समितीत रविवारी पहिली पावसाळी लाल कांद्याची आवक झाल्याने मालाचे पूजन होऊन लिलाव करण्यात आला.
चाळीसगाव : बाजार समितीत रविवारी पहिली पावसाळी लाल कांद्याची आवक झाल्याने मालाचे पूजन होऊन लिलाव करण्यात आला. नाणे येथील कांदा उत्पादक शेतकरी एकनाथ हरी माळी यांचा यावेळी ज्येष्ठ संचालक व व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चाळीसगाव बाजार समितीत तीन वर्षापूर्वी कांदा मार्केट सुरू करण्यात आले. यामुळे शेजारच्या मालेगाव, नांदगाव, पाचोरा, भडगाव, कन्नड येथूनही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी शेतकरी कांदा आणतात. पावसाळी हंगामातील 'लाल' कांद्याची पहिली आवक रविवारी झाली. नाणे येथील लाल कांदा उत्पादक शेतकरी एकनाथ माळी यांनी ४० क्विंटल कांदा विक्रीसाठी आणल्यानंतर बाजार समितीत मुहूर्ताची आवक म्हणून कांद्याचे पूजन केले. लिलावात लाल कांद्याला ११११ रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला. बाजार समितीचे डी.एस.गायके, यू.एम. नेरकर, एस.डी.बारेला यांच्यासह शेतकरी व व्यापारी आदींची उपस्थिती होती.