लाल कांद्याचे भाव पांढऱ्या कांद्यापेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:50 PM2018-12-08T12:50:14+5:302018-12-08T12:51:14+5:30
आवक वाढून दररोज ५० रुपयांनी घसरण
जळगाव : दर्जानुसार कांद्याला मिळणाºया भावामध्ये कमी दर्जाच्या कांद्यापाठोपाठ उच्च दर्जाच्या कांद्याच्या भावातही घसरण होऊन उच्च दर्जाचा कांदा १४५० रुपये प्रती क्विंटलवरून ८०० रुपये प्रती क्विंटलवर आला आहे. मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दिवसेंदिवस कांद्याचे भाव कमी होत आहे. यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे पांढºया कांद्याच्या भावापेक्षाही लाल कांद्याचे भाव कमी झाले आहे.
आॅक्टोबर महिन्यापासून जळगाव बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली. दिवसेंदिवस ही आवक वाढत जाऊन गेल्या दोन महिन्यापासून कांद्याचे भाव सतत कमी होत गेले. नवीन कांद्याची आवक सुरू होताच १० आॅक्टोबर रोजी चांगल्या दर्जाच्या कांद्याचे भाव १००० रुपये प्रती क्विंटलवर आले होते. त्यानंतर मात्र दुसºया आठवड्यात आवक ६०० क्विंटलवरून २७५ क्विंटलवर आली व कांद्याच्या भावांमध्ये सुधारणा होऊन कांद्याचे भाव १७५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले होते. त्यानंतर त्याच्या दुसºया आठवड्यात कांद्याची आवक ७७५ क्विंटलवर पोहचली व भाव १४५० रुपयांवर आले. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी कांद्याची आवक थेट २१०० क्विंटल झाली. त्यानंतरही आवक दिवसेंदिवस वाढत जाऊन दररोज ५० रुपये प्रती क्विंटलने भावात घट होत आहे.
शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी तर कांद्याच्या आवकने तर उच्चांकी गाठत एकाच दिवसात कांद्याची ३०५० क्विंटल आवक झाली व चांगल्या दर्जाचा कांदा ८०० रुपये प्रती क्विंटलवर आला.
दुय्यम दर्जाचा कांदा घेण्यास कोणी तयार नाही
चांगल्या दर्जाच्या कांद्याचे भाव कमी होत असताना दुय्यम दर्जाचा कांदा गेल्या महिन्यात २ रुपये प्रती क्विंटलवर आला होता. आताही हा कांदा कोणी घ्यायला तयार नसून कांदा उत्पादक मेटाकुटीस आले आहे. या कांद्याचे करायचे काय, असा सवाल कांदा उत्पादक करीत आहे.
पांढ-या कांद्याचे भाव जास्त
एरव्ही पांढºया कांद्याला मागणी जास्त नसल्याने त्यांचे भाव लाल कांद्यापेक्षा कमी असतात. मात्र आता तर लाल कांद्याची आवक वाढल्याने या कांद्याचे भाव पांढºया कांद्यापेक्षाही कमी झाले आहे. पांढरा कांदा २५० ते ९७५ रुपये प्रती क्विंटल आहे तर लाल कांद्याचे भाव ८०० रुपये प्रती क्विंटल आहे.
इतर जिल्ह्यातूनही आवक वाढली
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यासह धुळे जिल्हा तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड भागातून कांद्याची आवक सुरू आहे. त्या भागांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने तेथून ही आवक वाढली असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हाभरात स्थिती बिकट
जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील चोपड्यासह अडावद, लासूर, किनगाव, चहार्डी या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. तसेच चाळीसगाव, यावल तालुक्यातील किनगाव व परिसरात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र हा कांदा त्या-त्या बाजार समिती व उप बाजात समितीमध्ये विक्री होत असून तेथेही कांद्याचे भाव गडगडले असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर चोपडा तालुक्यात व्यापारी मंडळी गावांमध्ये जाऊन कांद्याची खरेदी करतात. तेथेही भाव कमीच मिळत असल्याचे कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे.
आयातीमुळे कांदा शिल्लक
मध्यंतरी पाकिस्तानमधून कांद्याची आयात केल्याने नाशिकसह अनेक ठिकाणचा उन्हाळी शिल्लक राहिला. हा कांदा विक्री होत नाही तोच नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याचे भाव कमी-कमी होत असल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले.
किरकोळ बाजारात भाव ‘जैसे थे’
कांद्याचे भाव गडगडले असले तरी त्याचा ग्राहकांना फायदा नसल्याचे चित्र किरकोळ बाजारात आहे. एकतर कमी भाव मिळत असल्याने उत्पादक हवालदिल झाले तर या कमी भावाचा फायदा ग्राहकांना होत नाही. किरकोळ बाजारात कांदा अजूनही १० ते १५ रुपये प्रति किलोनेच विक्री होत आहे.
कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कांद्याचे भाव कमी झाले आहे. गेल्या दोन महिन्यापासून नवीन कांद्याची आवक सुरू झाली. त्यामुळे भाव कमी होत आहेत.
- वासू पाटील, विभाग प्रमुख, फळे व भाजीपाला विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव.
कांद्याचे भाव दररोज कमी होत असून यामुळे मोठे संकट कांदा उत्पादकांवर ओढावले आहे. सध्या जो भाव मिळत आहे, त्यात उत्पादन खर्चही निघत नाही.
- अलीम अली काझी, कांदा उत्पादक.