पाचोऱ्यात लालपरी रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 03:19 PM2020-11-13T15:19:54+5:302020-11-13T15:22:03+5:30
एसटीचे उत्पन्नात दिवसागणिक सुधारणा होत आहे.
श्यामकांत सराफ
पाचोरा : गेल्या सात महिन्यात कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन झाल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद होऊन एसटीचे जीवन विस्कळीत झाले होते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून एसटीची वाहतूक हळूहळू सुरू होऊन आजच्या स्थितीत पाचोरा आगारातून प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. लालपरी रुळावर आली असून, लांब पल्ल्याच्या गाड्या प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादाने सुरू झाल्या आहेत. यामुळे एसटीचे उत्पन्नात दिवसागणिक सुधारणा होत आहे.
पाचोरा आगारात ४४ प्रवासी गाड्या सुस्थितीत असून, ५ मालवाहतूक गाड्या तैनात आहेत. आगारातून दररोज १५२ फेऱ्या साधारण १६ हजार ३९२ किलोमीटरचा प्रवास करून दैनंदिन उत्पन्न सरासरी ३ लाख ३० हजारापर्यंत मिळविण्यात आगाराला यश आले आहे. आगाराचे दैनंदिन सरासरी उत्पन्नात सद्य:स्थितीत ३० टक्के घट असली तरी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करून उत्पन्नात वाढ करण्यात येत आहे.
आगाराचे मासिक उत्पन्न सरासरी दीड कोटीचे आहे, मात्र कोरोणानंतर अनलॉक कालावधीत सप्टेंबर ३३ लाख, ऑक्टोबरमध्ये ६० लाखापर्यंत मासिक उत्पन्न आले, तर नोव्हेंबरमध्येही स्थिती चांगल्याप्रकारे सुधारत असल्याचे आगार व्यवस्थापक देवेंद्र वाणी यांनी सांगितले.
आगारास मालवाहतुकीतून दरमहा सुमारे पाच लाखाचे उत्पन्न मिळते. आगाराला ४८ शेड्युल मंजूर असून सध्या ४४ शेडूल सुरू आहेत. पाचोरा आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्यांना चांगला प्रतिसाद आहे. पाचोरा -पुणे ४ फेऱ्या यात सकाळी ७ वाजता भडगाव नगर मार्गे पुणे, ७.३० घाटनांद्रा औरंगाबाद मार्गे पुणे, ८.३० वाजता भडगाव मालेगाव मार्गे पुणे, तर ९ वाजता भडगाव संगमनेर मागे पुणे, अशा फेऱ्या सुरू करण्यात आले आहेत, तर पाचोरा- कल्याणच्या २ फेऱ्या सकाळी ८ व ९ वाजता नियमित सुरू झाल्या आहेत. पाचोरा-सुरत ह्यादेखील २ फेऱ्या सकाळी ८ व ११ वाजता सुरू केल्या आहेत. असून पाचोरा -बोरीवली सकाळी ६.३० पाचोरा-नंदुरबार सकाळी ७, पाचोरा-औरंगाबाद ८.३० अशा असून पाचोरा-मालेगाव ९ फेऱ्या आहेत. पाचोरा-नाशिक दुपारी १२.३० असल्याने प्रवाशांना रेल्वेची वाट पाहण्याची गरज नाही. यामुळे व्यवस्थापकांनी जादा गाड्यांचीसुद्धा व्यवस्था केली आहे.
बसस्थानकाचे नूतनीकरणही केले आहे. मात्र या ठिकाणी अद्याप काही काम अपूर्ण अवस्थेत असून आगार यार्डात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. बसस्थानकाच्या आवारात घाणीचे साम्राज्य असल्याने स्वच्छतेकडे लक्ष देऊन आगाराच्या मोकळ्या मैदानात वृक्षारोपण, बगीच्या फुलवावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात अद्यापही एसटीची वाहतूक सुरळीत झाली नसून प्रवाशांचा ओघ कमी आहे यामुळे ्रामीण भागात फेर्या वाढविण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांनी एसटीतून प्रवास करावा व एसटीची मागणी केल्यास फेऱ्या वाढविण्यात येतील, अशी माहिती स्थानकप्रमुख तिवारी यांनी दिली.