तक्रारी न करता मरगळ झटकून कामाला लागा - काँग्रेसचे सचिव रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:02 PM2018-12-27T13:02:05+5:302018-12-27T13:02:22+5:30
बुथ कमिटीचा घेतला आढावा
जळगाव : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळाले आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही देशात परीवर्तन घडविण्याची ताकद कॉंग्रेसमध्येच असून तक्रारी न करता मरगळ झटकून कामाला लागा अशा सूचना अ.भा. कॉंग्रेसचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी चेल्ला वामशी चांद रेड्डी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
आगामी काळात होणाºया निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अ.भा. कॉंग्रेसचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी चेल्ला वामशी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीत बुधवारी कॉंग्रेस भवनात लोकप्रतिनीधी व पदाधिकाºयांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश चिटणीस माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश सचिव डी.जी.पाटील, जिल्हा प्रभारी डॉ. हेमलता पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, महागराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, जिल्हा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन राजीव पाटील, माजी आमदार निळकंठ फालक, भगतसिंग पाटील, जि.प. सभापती दिलीप पाटील, राजस कोतवाल, ज्योत्स्ना विसपुते, देवेंद्र मराठे, सचिन सोमवंशी, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, अनिता खरारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अनुपस्थित सदस्याची कान उघडणी
बैठकीत ब्लॉकनिहाय बुथ कमिटीचा आढावा घेण्यात आला. विजय महाजन, ज्योत्स्ना विसपुते, राजाराम पाटील, रवींद्र निकम यांच्यासह ब्लॉक अध्यक्षांनी बुथ कमिटीचा अहवाल चेल्ला रेड्डी यांना सादर केला. चेला रेड्डी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अहवालाची तपासणी केली. बुथ कमेटीतील कार्यकर्त्यांना थेट संपर्क साधून ते कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत का? याची पडताळणी त्यांनी केली. तसेच बुथ प्रमुख आणि कमेटीतील जे सदस्य बैठकीला अनुपस्थित राहीले त्यांची कान उघाडणीदेखील चेल्ला रेड्डी यांनी केली.