पाच हजार मे.टन खतांचा कमी पुरवठा
By Admin | Published: May 9, 2017 12:57 AM2017-05-09T00:57:49+5:302017-05-09T00:57:49+5:30
25 हजार मे.टन युरीया उपलब्ध : मागणी 3 लाख टनावर
जळगाव : जि.प.च्या कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे सरळ, संयुक्त व मिश्र खतांचा मिळून तीन लाख 30 हजार मे.टन एवढी मागणी केली होती. पैकी तीन लाख 25 हजार 700 मे.टन खते जिल्ह्यास मिळतील, अशी मंजुरी कृषी आयुक्तालयाने दिली आहे. अर्थातच मागणीच्या तुलनेत पाच हजार मे.टन खते कमी मिळतील. तसेच सध्या 2016 च्या रब्बीमधील शिल्लक असलेला 11 हजार 500 मे.टन व या हंगामात उपलब्ध झालेला 13 हजार 456 मे.टन असा जवळपास 25 हजार मे.टन युरीया जिल्ह्यात उपलब्ध असल्याची माहिती जि.प.च्या कृषी विभागाने दिली आहे.
खरिपाची तयारी कृषी विभागाने केली आहे. त्यात युरीयाबाबत अनेक तक्रारी असतात, पण मागील हंगामापासून निमकोटेड युरीया मिळत असून, त्याचा काळाबाजार, टंचाई कमी झाली आहे. यातच या हंगामासाठी आतार्पयत फक्त 25 हजार मे.टन युरीया उपलब्ध असल्याने एवढा युरीया अपुरा पडेल. त्यामुळे आठवडाभरात किंवा मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ार्पयत किमान एक लाख मे.टन युरीया जिल्हाभरात उपलब्ध करून घेण्यासंबंधी कृषी विभाग कार्यवाही करीत असल्याची माहिती मिळाली.
पोटॅशची दरवाढ
पोटॅशचे दर गोणीमागे (50 किलो) 580 रुपये एवढे होते. त्यात 50 रुपये दरवाढ झाली असून, वाढीव दरातील गोण्या अजून प्राप्त झालेल्या नाहीत. ज्या गोण्यांवर जुनी 580 रुपये किंमत आहे त्याच दरात त्या विक्री करणे बंधनकारक असल्याची सूचना कृषी विभागाने प्रसारित केली आहे.
जिल्ह्यात युरीयाची गरज अधिक असते त्यामुळे युरीयाची मागणीही कृषी आयुक्तालयाकडे केली होती. त्यानुसार एक लाख 24 हजार 500 मे.टन युरीया खरिपात अखेरच्या टप्प्यार्पयत जिल्हाभरात उपलब्ध होईल. तर संयुक्त म्हणजेच 10.26.26, 12.32.16, 20.20.0, 15.15.15 आदी खते मिळून 77 हजार 700 मे.टन एवढी उपलब्ध होतील.
सध्या युरीयाचा पुरवठा कमी दिसत असला तरी अद्याप खरीप हंगामाची पेरणी, लागवड सुरू झालेली नाही. येत्या 15 दिवसात युरीयाचा अधिकाधिक पुरवठा होईल यासाठी कार्यवाही सुरू आहे. खते मुबलक प्रमाणात असतील.
-मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जि.प.