खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात, भावातही घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:05 AM2021-07-13T04:05:59+5:302021-07-13T04:05:59+5:30
विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात केंद्र सरकारने ...
विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात केंद्र सरकारने कपात केल्याने खाद्य तेलाचे भाव कमी होत आहे. त्यामुळे १७५ रुपयांपर्यंत पोहोचलेले सोयाबीन तेलाचे भाव आता १४६ रुपये प्रति किलोवर आले आहेत. शेंगदाणा तेलही १७० ते १७५ रुपयांवर आले आहेत.
दररोज प्रत्येक घर, तसेच खाद्यपदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास, त्याचा मोठा परिणाम स्वयंपाकघराच्या ‘बजेट’वर होत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात गेल्या आठवड्यापासूनच घसरण होत आहे. त्यात केंद्र सरकारने आयात शुल्कात ३० टक्क्यांनी कपात केल्याने तेलाचे भावही कमी होत आहेत.
एरव्ही पामतेलाचे भाव इतर तेलांच्या तुलनेत कमीच असतात. मलेशियामधून आयात होणाऱ्या या तेलावर आयात शुल्क वाढविण्यात आले होते. यामुळे पामतेलाचे भाव वाढले होते. सर्वात कमी भाव असलेल्या पामतेलाचे भाव सोयाबीन तेलाच्या भावापर्यंत पोहोचल्याने त्याचा परिणाम होऊन सोयाबीन तेलाचेही भाव कडाडले. त्यामुळे सोयाबीन तेल १७५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. सोयाबीन तेलाचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक भाव असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
खाद्यतेलातील भाववाढ सर्वांचीच डोकेदुखी बनल्याने, सरकारच्या विरोधातही रोष व्यक्त होत आहे. यामध्ये आता केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केली असून, यामुळे खाद्यतेलाचे भाव कमी होण्यास मदत होत आहे.
तेलाचे भाव
तेल-पूर्वी- आता
सोयाबीन तेल-१६५ ते १७५ -१४६ ते १४७
शेंगदाणा तेल-१९० ते १९५-१७० ते १७५
सूर्यफूल तेल-१७५ ते १८० -१५५ ते १६०
पामतेल-१५० ते १५५-१२६ ते १२८
तीळ तेल-२००-२००
पाऊस झाल्यास भावात आणखी घसरण
सध्या हवा तसा पाऊस नसल्याने पिकांवर विशेषत: सोयाबीनवर परिणाम होण्याच्या शक्यतेचा बाजारपेठेवर परिणाम आहे. पाऊस झाल्यास तेलाचे भाव आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात झाल्याने तेलाचे भाव कमी होत आहे. पाऊस झाल्यास आणखी हे भाव कमी होऊ शकतात.
- मनीष देवपुरा, तेल व्यापारी, जळगाव.