२० ते ३० हजार लिटरने दुध विक्रीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:15 PM2020-03-25T12:15:41+5:302020-03-25T12:15:57+5:30
‘कोरोना’चा परिणाम : दुग्धजन्य पदार्थांचीही मागणी घटली
जळगाव : कोरोनाने जगभर थैमान घातले असताना दूध उद्योगांवरही त्याचा परिणाम होत असून जिल्हा दूध संघातून होणारी दुधाची विक्री तब्बल २० ते ३० हजार लिटरने घटली आहे़ दुसरीकडे मात्र, दूध डेअरीवर ‘पनीर’ला मागणी वाढल्याचे चित्र आहे.
जगासह देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यात संचारबंदी लागू केली आहे़ किराणा दुकान, दूध डेअरी तसेच मेडिकल, पेट्रोल पंप यासह अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहेत़ संचारबंदी असताना सुध्दा जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक दुकाने तसेच दूध डेअरींवर गर्दी करीत आहेत़ जिल्हा दूध संघामध्ये नेहमी प्रमाणे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून आलेले दूध संकलन केले जाते़ दिवसाला तीन ते सव्वा तीन लाख लिटर दूध संकलित केले जाते़ दूध उत्पादने व पिशवी बंद दूध तयार करून त्यांची बुथवर विक्री सुरु आहे.
पनीरची अधिक मागणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल्स् बंद झाल्या आहेत़ त्यामुळे पनीरची मागणी वाढली असल्याचेही डेअरी चालक यांनी सांगितले़ दिवसाला १० किलो पनीर विक्री होत होते, आता २० किलो दिवसाला विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ दूध व इतर साहित्य घेण्यासाठी कुणीही गर्दी करू नये असेही आवाहन दूध विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे़
बहुतांश हॉटेल चालक दूध खरेदी करून पनीर तयार करतात. त्यामुळे खवय्यांना तेथे पनीर भाजी, पनीरचे पदार्थ उपलब्ध होतात. मात्र हॉटेल बंद असल्याने घरगुती वापरासाठी पनीरची मागणी वाढली असल्याचे डेअरी चालकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, जिल्हा दूध संघाकडे आता घटलेली मागणी २० ते ३० हजार लिटर असली तरी काही दिवसात हा आकडा ५० हजार लिटरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘कोरोना’चा फटका, दूध विक्री घटली
देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव हा राज्यात दिसून आला़ याचा फटका दूध उत्पादकांनाही बसला़ जळगाव जिल्हा दूध संघातून दररोज लाखो लिटर दूध वितरीत होत असताना यामध्ये आता २० ते ३० टक्कयांनी दूध विक्री घट झाली आहे़ दही, ताक, लस्सी याचीही विक्री कमी झाली असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली़
डेअरी चालक म्हणतात मागणी वाढली
कोरोनाच्या भितीपोठी शहरातील काही दुधाचे बुथही बंद झाली आहे़ मात्र, दुसरीकडे शहरातील डेअरींवर नागरिकांनी दूध खरेदीसाठी गर्दी होत आहे़ एकीकडे घट होत असताना दूध डेअरींवर दूधाची मागणी वाढली असल्याचे दूध डेअरी संचालक मुकेश टेकवाणी यांनी सांगितले़ दिवसाला १ हजार लिटर दूधाचे संकलन होते व ते विक्रीही होते़ दही,ताक आदींची नेहमीप्रमाणे जेवढी मागणी आहे, तेवढी होत असून कोरोनामुळे रात्री ९ वाजेनंतर डेअरी बंद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचेही टेकवाणी यांनी सांगितले़