अंतुर्ली येथे पुनर्वसितांची कर भरण्यास ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:48 AM2018-09-25T01:48:36+5:302018-09-25T01:49:27+5:30
सुविधांअभावी त्रस्त प्लॉटधारकांनी ग्रा.पं.ला दिले निवेदन
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील अंतुर्ली येथील पुनर्वसित प्लॉटधारकांना कोणत्याही सोयी सुविधा न देता कर वसुली केली जात असल्याची तक्रार प्लॉटधारक ग्रामस्थांनी केली आहे. कोणतीही कर वसुली करण्यात येऊ नये, या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिले.
पुनर्वसनाचे भूसंपादन १९९७ ला झाले. शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार रहिवाशांना मूलभूत नागरी सुविधा पुरवणे हे ग्रामपंचायत स्तरावर अपेक्षित होते. या सुविधांमध्ये रस्ते, गटारी, सांडपाण्याची व्यवस्था, पथदिवे, घरगुती वीज कनेक्शन सुविधा व इतर सुविधांचा समावेश होतो. परंतु या ठिकाणी वितरित झालेल्या प्लॉटधारकांनी घरे बांधकाम केल्यानंतरदेखील अद्याप कोणत्याही सुविधा पुरविलेल्या नाही पाण्याव्यतिरिक्त याठिकाणी कोणत्याही सुविधा नाही. ग्रामपंचायतीने यासंदर्भात सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. शासनाकडून विद्युत ट्रान्सफॉर्मरही बसवण्यात आले, पण ते कार्यान्वित होण्याआधीच सरपंच व ग्रा.पं. सदस्यांच्या सांगण्यावरून ते ट्रान्सफार्मर काढून घेण्यात आले आहे.
निवेदनावर विनोद प्रभाकर महाजन, श्रीकृष्ण प्रकाश महाजन, सुनील पाटील, प्रभाकर महाजन, रवींद्र बेलदार, नीलेश महाजन, सागर कोळी, दिनेश बाळ, सुरेश पाटील, योगेश बेलदार, अरुण बेलदार, रवींद्र दुटी, अर्जुन धनगर, सतीश कुंभार, रमेश महाजन,महेंद्र बेलदार यासह ८५ ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.