जळगाव येथे पाच रुपयांच्या नोटा घेण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:09 PM2018-01-14T13:09:41+5:302018-01-14T13:12:10+5:30
गैरसमज : चांगल्या स्थितीतील नोटाही घेत नसल्याने ग्राहक संभ्रमात
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 14 - शहरातील विविध भागात पाच रुपयांच्या चलनी नोटा घेण्यास नकार दिला जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दहा रुपयांच्या नाण्यांपाठोपाठ आता पाच रुपयांच्या नोटा घेतल्या जात नसल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत.
पाच रुपयांच्या नोटा जुन्या होऊन खराब झाल्या आहेत. या खराब व फाटलेल्या नोटा सहसा कोणी घेत नाही. मात्र आता तर या खराब नोटांसह शहरातील संतोषीमाता नगर, एमआयडीसी परिसर, कुसुंबा तसेच शहरातील इतर भागात विक्रेते चांगल्या स्थितीतीलही पाच रुपयांच्या नोटा घेण्यास नकार देत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
होलसेल विक्रेते घेत नसल्याची सबब
नोटा घेण्यास नकार देण्या:या विक्रेत्यांना याबाबत ग्राहकांनी विचारले असता आम्ही जेथून माल आणतो ते आमच्याकडून पाच रुपयांच्या नोटा घेत नाही. त्यामुळे आम्ही त्या स्वीकारत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. काही जण तर आम्हीच सरकार आहोत, नोटा घ्यायच्या की नाही ते आम्हीच ठरवू, असे उत्तर देत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
काही ठिकाणी प्रत्यक्ष विचारणा केली असता काही दुकानदारांनी सांगितले की, एखादी नोट असेल तर ती द्या, त्यापेक्षाजास्त घेत नाही. तर काही जण म्हणत होते, नोटा बंद नसल्या तरी त्या कोणी घेत नसल्याने आम्हीही घेत नाही.
नवीन नोटा बाजारात नाहीच
पाच रुपयांच्या नवीन नोटा बाजारात येत नसल्याने मुळातच त्यांचा तुटवडा असल्याचे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे ज्या नोटा आहे, त्या हाताळून जास्त खराब होतात. दिवाळीच्या काळात नवीन नोटा आल्या तरी त्या काही मोजकी मंडळीच बँकांमधून घेऊन जात असतात व त्या त्यांच्याकडेच राहतात. त्या चलनात न आणल्याने तुटवडा भासतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
10 रुपयांच्या नाण्यांपाठोपाठ पाचच्या नोटास नकार
काही महिन्यांपूर्वी बाजारपेठेत 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार दिला जात होता. हे नाणे चालत नाही, अशी अफवाही त्या वेळी पसरविण्यात आली. मात्र हे नाणे घेण्याबाबत स्पष्टीकरण झाल्याने नाणे स्वीकारले जाऊ लागले. त्या नंतर आता पाच रुपयांच्या नोटांबाबत नकार दिला जात असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.
पाच रुपयांच्या नोटा आम्ही तर स्वीकारत आहे. त्या चलनात असून त्या सर्वानी स्वीकारल्या पाहिजे.
- ललित बरडिया, सचिव, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ