दहावीसाठी ५८ हजार तर बारावीसाठी ४८ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:00+5:302021-03-18T04:16:00+5:30
परीक्षा : नोंदणीचे प्रमाण घटले : बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दहावी आणि बारावीची परीक्षा ...
परीक्षा : नोंदणीचे प्रमाण घटले : बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याने बोर्डाकडून जोरदार तयारी सुरू आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातून दहावीसाठी ५८ हजार ५१८, तर बारावीसाठी ४८ हजार ३०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. बारावीला गतवर्षी ५९ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ४८ हजार ३०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. दुसरीकडे गतवर्षी दहावीसाठी ६४ हजार ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता ५८ हजार ५१८ नियमित तर १ हजार ६८२ फेरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली.
बहुसंख्य विद्यार्थ्यांचा गॅप!
- मागील वर्षी कोरोनाने हाहा:कार माजवल्यानंतर शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तब्बल आठ ते नऊ महिन्यांनी शाळा, महाविद्यालयांची घंटा वाजली. परंतु, कोरोनाच्या भीतीने बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हे वर्ष ‘ड्रॉप’ केले. अनेकांकडे ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे ते ऑनलाईन शिक्षणापासूनही वंचित राहिले.
- गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी संख्येमध्ये कमालीची घट झाली आहे. दरम्यान, अजूनही अतिविलंबाने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
दहावीचे परीक्षार्थी
२०२० : ६४ हजार ५०
२०२१ : ५८ हजार ५१८
दहावीची परीक्षा - २९ एप्रिल ते २९ मे
बारावीचे परीक्षार्थी
२०२० : ५९ हजार ४०३
२०२१ : ४८ हजार ४००
बारावीची परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे