जीएमसीत रुग्णाच्या चुकीच्या रक्तगटाची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:25 AM2021-05-05T04:25:31+5:302021-05-05T04:25:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एका महिला रुग्णाच्या रक्तगटाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्ततपासणी प्रयोगशाळेत चुकीची नोंदणी झाल्याचा प्रकार ...

Registration of incorrect patient blood group with GM | जीएमसीत रुग्णाच्या चुकीच्या रक्तगटाची नोंदणी

जीएमसीत रुग्णाच्या चुकीच्या रक्तगटाची नोंदणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एका महिला रुग्णाच्या रक्तगटाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्ततपासणी प्रयोगशाळेत चुकीची नोंदणी झाल्याचा प्रकार या महिलेसाठी रेडक्रॉस सोसायटीत प्लाझ्मा घेताना समोर आला. या प्रकाराबाबत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सोमवारी सायंकाळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पाेटे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. यावर चौकशी करण्याचे आश्वासन डॉ. पोटे यांनी दिले आहे.

नातेवाइकांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना कळविल्यानुसार महिला रुग्णाला प्लाझ्माची आवश्यकता होती. त्यासाठी रक्तगट तपासणी केली असता, त्यांना एबी पॉझिटिव्ह प्लाझ्मा लागेल, असे सांगण्यात आले. मात्र, महिलेचा मुलगा रेडक्रॉस सोसायटीमध्ये गेला. तेथे गेल्यानंतर रेडक्रॉस सोसायटीच्या तंत्रज्ञांनी या महिलेचा रक्तगट हा बी पॉझिटिव्ह असा असल्याने त्यांना याच रक्तगटाचा प्लाझ्मा लागेल, असे सांगितले. यामुळे प्लाझ्मा एबी पॉझिटिव्हचा घ्यावा की बी पॉझिटिव्हचा असा त्यांच्या मनात गोंधळ उडाला.

प्रशासनाचे म्हणणे काय

महिलेला प्लाझ्मा द्यावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली होती. रक्ततपासणी प्रयोगशाळेत नोंदणी चुकीची झाली, ही चूक आहे. त्याची चौकशी होईलच मात्र, प्लाझ्मा जेव्हा देण्यात येताे त्यावेळी रेडक्रॉस रक्तपेढीला कोणत्या रक्तगटाचा प्लाझ्मा हवा, असे लिखित दिले जात नाही तर रुग्णाच्या रक्ताचे सँपल दिले जाते. जेव्हा रेडक्रॉस सोसायटीत बी पॉझिटिव्ह रक्तगट समोर आला तेव्हा आम्ही इकडे तपासणी केली. बी पाॅझिटिव्ह रक्तगट असल्याचे निश्चित झाल्यानंतर तोच प्लाझ्मा रुग्णाला देण्यात आला.

कारवाईचे आश्‍वासन

कुलभूषण पाटील यांनी याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांच्याशी चर्चा केली. डॉ. पोटे यांनी देखील हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे मान्य केले. या प्रकरणात तंत्रज्ञाची चूक असून, याबाबत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. पोटे यांनी दिली. यावर कुलभूषण पाटील यांनी नेमकी कारवाई कधीपर्यंत होणार, अशी विचारणा केली असता उद्या दुपारपर्यंत कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉ. पोटे यांनी दिली.

Web Title: Registration of incorrect patient blood group with GM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.