रेमडेसिविरचा खुलासा न देणाऱ्या दोन रुणालयांची नोंदणी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:01+5:302021-04-27T04:17:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आवश्यकता नसताना शिवाय अधिकार नसताना रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना दिल्याच्या प्रकरणात नोटीस देण्यात आलेल्या चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आवश्यकता नसताना शिवाय अधिकार नसताना रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना दिल्याच्या प्रकरणात नोटीस देण्यात आलेल्या चार रुग्णालयांपैकी भुसावळ येथील मुस्कान हॉस्पिटल व एरंडोल येथील शहा हॉस्पिटल या दोन रुग्णालयांची बॉम्बे नर्सिंग ॲक्टअंतर्गतची नोंदणी तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सोमवारी ही कारवाई केली. दरम्यान, अन्य दोन रुग्णालयांच्या या नोंदणी निलंबित करण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
जिल्हाभरात रेमडेसिवीर या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर याच्या वापरावर अनेक निर्बंध प्रशासनाने लावले होते. निकषात बसतील अशा आवश्यक रुग्णांनाच ते दिले जावे, असे आदेश प्रशासकीय पातळीवरून देण्यात आले होते. शिवाय हे इंजेक्शन देण्याचा अधिकार हा केवळ फिजिशियनला होता. अशा स्थितीत चार रुग्णालयांमध्ये अनावश्यक व अधिकार नसताना हे इंजेक्शन वापरले जात असल्याचे समोर आले होत. त्यानुसार भुसावळ येथील मुस्कान हॉस्पिटलचे डॉ. तौसीफ खान, एरंडोल येथील शहा हॉस्पिटलचे डॉ. जाहीद शहा, कजगाव ता. भडगाव येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. निखिल बोरा व पहूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. सचिन भडांगे यांना काही दिवसांपूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या व दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवाय खुलासा सादर न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र, खुलासा सादर न केल्याने यातील दोन रुग्णालयांची बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गतची देण्यात आलेली नोंदणी तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे.
दोन रुग्णालयांच्या कारवाईसाठी पत्र
नोटीस देण्यात आलेल्या चारपैकी कजगाव येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल व पहूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल हे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने यांच्यावर नोंदणी निलंबित करण्याची कारवाई करावी, असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहे.