पाच वर्षांपासून विनामोबदला नियमित योग प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:29 PM2019-06-21T14:29:23+5:302019-06-21T14:30:05+5:30
देवीदास महाजन यांचा उपक्रम
पी. आर. माळी
चोपडा : मानवी जीवनात योगसाधनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग करण्यासाठी त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे लागते. मात्र, प्रशिक्षण देणारी व्यक्ती तज्ज्ञ असावी. कारण चुकीच्या पद्धतीने योग करणे धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच मोठमोठ्या शहरांसह सगळीकडेच योग क्लासेस उपलब्ध आहेत. इतर शिकवण्यांसारखाच हादेखील व्यवसाय बनत चालला आहे. कारण योग शिकणारांची संख्याही त्या तुलनेत वाढतेयं. त्यामुळे योग शिकविण्याचे वर्ग घेऊन भरपूर पैसे कमाविले जातात. मात्र, धानोरा येथील देवीदास महाजन गेल्या पाच वर्षांपासून ग्रमस्थांना योगासने शिकवितात. तेही अगदी विनामोबदला. सकाळी ५:३० ते ६:३० ही त्यांची नियमित वेळ. हा अवलिया योग प्रशिक्षक लाभला हे सुदैवच, असे धानोरावासीय सांगतात.
धानोरा, ता. चोपडा येथे सतपंथ ज्योत मंदिराच्या हॉलच्या वर गेल्या पाच वर्षांपासून नियमितपणे एखाद्या व्रतस्थाप्रमाणे योगविद्येचे धडे गिरवून घेणारे देवीदास हिरामण महाजन हे गावातीलच झि. तो. महाजन माध्यमिक विद्यालयात क्रीडा शिक्षक आहेत. त्यांनी सहा वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा एक वर्षाचा योग पदविका अभ्यासक्रम एम.जे. कॉलेज, जळगाव येथील अभ्यासकेंद्रातून पूर्ण केला. तेव्हापासून ते कोणताही मोबदला न घेता अविरतपणे योग प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत.
सोहम विविधता व संशोधन विभाग जळगाव येथील प्रशिक्षकांच्या साहाय्याने त्यांनी अनेकदा मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचप्रमाणे नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून उपचार करण्यावर त्याचा भर आहे. त्यांच्या नित्याच्या प्रशिक्षणात १० ते ७० वर्षांपर्यंतचे आबालवृद्ध सारेच असतात. त्यात महिला, मुलींचाही समावेश असतो.