वाकडीतील पीडित मुलांचे पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:20 AM2018-07-15T01:20:24+5:302018-07-15T01:21:11+5:30
चारपैकी दोन मुले जळगावी बालनिरीक्षणगृहात, उर्वरित दोघांचेही लवकरच
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : वाकडीतील पीडित कुटुंबियांतील मुलांसाठी जिल्हा बालकल्याण समिती पुढे सरसावली असून, शैक्षणिक जबाबदारीसह या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ठामपणे उभी राहिली आहे. शनिवारी समितीच्या सदस्यांनी वाकडीत या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. पीडित मुलांसह त्यांचा अल्पवयीन भाऊ व बहिण यांना घेऊन जळगाव येथील बालनिरीक्षकगृहात दाखल केले असून, या पीडित कुटुंबाचे पुनर्वसन केले आहे.
वाकडी येथे गेल्या महिन्यात विहिरीत पोहल्याच्या शुल्लक कारणावरुन मातंग समाजाच्या दोन अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार यांना अटक करण्यात आली आहे, तर अजित तडवी व शकनूर तडवी यांना गावबंदीच्या शर्तीवर जामीन मिळाला आहे. याठिकाणी अनेक मंत्री, आमदार व सामाजिक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन काहीनी तुटपुंजी मदत देऊन आपल्या पद्धतीने सोयीचे राजकारण केल्याचे दिसून आले आहे.
या समितीचा मूळ उद्देश एकच की, अनाथ, पीडित, गोरगरीब मुलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्याचा आहे. या हेतूने जिल्हा बालकल्याण समितीने संवेदनशील मन जपून वाकडीतील पीडित कुटुंबांच्या घरी शनिवारी नितीन विसपुते व डॉ.शैलेजा चव्हाण या सदस्यांनी भेटी देऊन या कुटुंबांची व्यथा जाणून घेतली. या पीडित मुलांसह त्यांच्या कुटुंंबातील अल्पवयीन भाऊ-बहिण यांच्या शिक्षणासह त्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
शनिवारी दोन पीडित मुलांना या सदस्यांनी वाकडी गावातून सोबत घेऊन जळगावातील बालनिरीक्षकगृहात दाखल केले आहे. अशी एकूण पीडित चार मुले असून, यांच्यासह १८ वर्षांखालील भाऊ-बहिण यांची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन ते तीन दिवसात राहिलेले पीडित दोन मुलांनादेखील निरीक्षणगृहात दाखल केले जाणार आहे. आज एक कुटुंब शेतात गेलेले होते. यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे या सदस्यांच्या संपर्कात आहेत.
व्यावसायिक शिक्षण मुंबईत
या पीडित मुलांसह त्यांच्या भाऊ बहिणींचे अठरा वर्षांपर्यंत शिक्षण जळगाव येथे होईल. त्यानंतर अठरा ते एकविस वर्षापर्यंत पुढील शिक्षण हे मुंबईत दिले जाणार आहे. या काळात या मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले जाणार आहे.
पीडित मुलांसह त्यांच्या भाऊ बहिणींची काळजी, संरक्षण, शिक्षण देण्याच्या दृष्टीने समिती कार्य करीत आहे. या पीडित कुटुंबातील अठरा वर्षांखालील मुलांची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी समितीने निर्णय घेतला आहे.
-नितीन विसपुते, सदस्य, जिल्हा बालकल्याण समिती, जळगाव