भारताचे संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:42 AM2019-06-01T01:42:55+5:302019-06-01T01:43:08+5:30

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह यांनी बांगला देशात भेट दिली. या भेटीवर आधारित प्रवास वर्णनात्मक लेखमाला ते ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत. आज त्यांच्या लेखमालेचा अकरावा भाग.

 Relation of India | भारताचे संबंध

भारताचे संबंध

Next

इंटरनेटवर ढाक्का सुरक्षित नाही, अशी बरीच भीतीदायक माहिती दिसते. परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती तितकी वाईट नाही. जागोजागी वायरलेससह पोलीस आहेत. कदाचित मी नशीबवान असेल, पण मला वाईट अनुभव आला नाही. आता पूर्वी इतके धोके नाहीत. असे स्थानिक लोकही सांगतात.
बांगला देश भेटी दरम्यान ढाक्क्यात रोटरीचे एक सभासद तारेक अफजल यांना मी भेटलो. ते रोटरी क्लब नारायणगंज या ६५ वर्षे जुन्या क्लबचे सभासद आहेत. त्यांचे वडील पै.अफझल हुसेन खासदार होते. अत्यंत प्रभावी पण साधा माणूस. आता ते हयात नाहीत. आग्रहाने त्यांनी निदान ‘चॉ, कोफी’ तरी घ्या म्हणून नारायणगंजला घरी नेले. आजही त्यांचे घर एकदम साधेच आहे. (आपल्याकडे एकदा खासदार झाला की, पहिला फरक त्यांच्या घरादारात आणि जमीन जुमल्यात पडतो. लाचखोर देशांच्या यादीतील बांगलादेशचे स्थान पाहता या बाबतीत हे कुटुंब मला मागासलेले वाटले!)
त्यांच्या घरात मुजीबुर रहेमान यांचा ७ मार्च १९७१ चे ऐतिहासिक संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीच्या भाषणाचा फोटो आणि ले. जन. कै. जगजीतसिंग अरोरा यांचा बांगला देशातील लोकांनी ठिकठिकाणी सत्कार केला त्याचे फोटो, बरोबरीने लावलेले होते. ते पाहून माझे मन आनंदाने आणि अभिमानाने भरून गेले.
ढाक्क्यात जेथे ले. जन. ए. के. नियाझी यांनी लेफ्टनंट जनरल जग्गीह्वसिंग यांच्यासमोर ९० हजार सैनिकांसह बिनशर्त शरणागती पत्करली तेथे एक मोठे स्वातंत्र्यस्मारक ‘स्वाधीनता स्तंभ’ (बं. उ. ‘शोधीनता स्तोम्भ’) उभारले आहे. यावरून आणि सामन्यत: सर्वच लोकांशी बोलताना भारताविषयी तेथे आत्मीयतेचीच भावना आहे हे जाणवले.
तेथील कितीतरी लोक शिक्षण आणि औषधोपचारासाठी भारतात येतात. मला भेटलेल्या लोकांपैकी एकाचे पूर्ण शिक्षणच भारतात झाले होते आणि याचा त्यांना अभिमान होता.
गेल्या काही वर्षांपासून बांगला देश काही सामाजिक निर्देशांकाच्या बाबतीत भारतापुढे निघून गेला आहे. उदा. नवजात मृत्यूदर, स्री-पुरुष समानता आणि सरासरी आयुर्मान इ. २०१३ ते २०१६ दरम्यान भारताची जीडीपी वाढ ५.६ टक्के होती तर बांगला देशाची १२.९ टक्के होती. २०१८ मध्ये ७.२८ टक्क्यांची वाढ होती. त्यांचा तयार कपड्यांचा वार्षिक व्यापार आहे २८ बिलियन डॉलर म्हणजे २२९६ अब्ज रुपये आणि तो गतीने वाढत आहे. याचे कारण असे सांगतात की, चीनने आपले लक्ष कपड्यांवरून अधिक नफा देणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांवर केंद्रित करायला सुरुवात केली, त्याचा फायदा बांगला देशाला झाला. चीनमध्ये तयार कपड्यांची किंमत एक टक्का वाढली तर बांगला देशच्या उत्पादनांची मागणी दीड टक्का वाढते. अर्थतज्ज्ञांच्या मते एकूणच कोणत्याही कारणाने असली तरी, ही गती अशीच राहिली तर बांगला देशाच्या आर्थिक वाढीचा दर सन २०२० मध्ये भारताला मागे टाकून पुढे निघून जाण्याची शक्यता दाट आहे. (क्रमश:)
-सी.ए.अनिलकुमार शाह, जळगाव

Web Title:  Relation of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.