खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:53+5:302021-06-23T04:11:53+5:30
साकेगाव येथे १३ जून रोजी रात्री कोळी व पाटील गटात वाद होऊन एकमेकांवर कुऱ्हाड व इतर शस्त्राने प्राणघातक हल्ला ...
साकेगाव येथे १३ जून रोजी रात्री कोळी व पाटील गटात वाद होऊन एकमेकांवर कुऱ्हाड व इतर शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला होता. यात मयुर सारंगधर पाटील व महेश सारंगधर पाटील तर कोळी गटातील ईश्वर उर्फ राहुल संतोष कोळी, नीलेश बळीराम सोनवणे व राहुल संतोष कोळी आदी पाच जण जखमी झाले होते. परस्पर तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या ९ जणांविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
दहा दिवस मृत्यूशी झुंज
दोन्ही गटातील जखमीवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु असताना दहाव्या दिवशी अर्थात २२ रोजी पहाटे नीलेश सोनवणे याने अखेरचा श्वास घेतला. दहा दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. डोक्यात कुऱ्हाडीचा घाव बसल्याने तो गंभीर जखमी होता. सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. नीलेशच्या मृत्यूची बातमी धडकताच त्याची बहिण वैशाली मुकेश सोनवणे, पत्नी अनिता नीलेश कोळी,रेखा विकास कोळी, मीराबाई संतोष कोळी, रवींद्र हरिचंद्र कोळी आदींनी जिल्हा रुग्णालय गाठले. हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा व अटकेची कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची भेट घेतली. त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
कोट...
दोन्ही गटाविरुध्द गुन्हे दाखल आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहे. तेथून सुटका होताच अटकेची कारवाई केली जाईल.
-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक