कोरोनाच्या संकटातही अंत्यसंस्काराची जबाबदारी नातेवाईकांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:46+5:302021-06-09T04:19:46+5:30
स्टार ७८७ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे २८०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू ...
स्टार ७८७
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे २८०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठीदेखील जागा शिल्लक राहत नव्हती. त्यावेळी महापालिका प्रशासनाने हात झटकल्याने अखेर अंत्यसंस्काराचा खर्चदेखील मृतांच्या नातेवाईकांनाच करावा लागला. एका व्यक्तीवरील अंत्यसंस्कारामागे नातेवाईकांना अडीच हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिका प्रशासनाने यावरचा खर्च उचलला होता. मात्र दुसऱ्या लाटेत महापालिकेनेदेखील हा खर्च नातेवाईकांवर सोपवून दिला. मृतांच्या अंत्यसंस्कारावर करण्यात येणारा लाकूड, पीपीई कीट यासह इतर खर्च हा मृतांच्या नातेवाईकांनाच करावा लागला. तसेच या ठिकाणी महापालिकेकडून तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना देखील मृतदेह उचलण्यासाठी नातेवाईकांनाच काही रक्कम द्यावी लागत होती. विशेष म्हणजे या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मनपाकडून देखील वेतन दिले जात होते. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत महापालिका व जिल्हा प्रशासनाने मृतांवर अंत्यसंस्काराबाबत दुर्लक्ष केल्याचे चित्र शहरात आढळून आले.
एकूण रुग्ण - १,५०,८९२
बरे झालेले रुग्ण- १,३५,२८९
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ३ हजार ४९
एकूण मृत्यू - २५५४
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेले मृत्यू - १०१९
खासगी रुग्णालयात झालेले मृत्यू - १५३५
एका अंत्यसंस्काराचा खर्च अडीच हजार
महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत झालेल्या मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचा खर्च हा नातेवाईकांवरच सोपवून दिला होता. एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना सुमारे अडीच हजार रुपयांचा खर्च येत होता. नागरिकांनीच स्मशानभूमीत लाकडे उपलब्ध करून घ्यावीत, यासह पीपीई कीट, गोवऱ्या, डिझेलचा खर्च देखील मृतांच्या नातेवाईकांना करावा लागला. विशेष म्हणजे लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी देखील महापालिकेने कोणतीही जबाबदारी घेतली नाही. काही काळासाठी शहराचे आमदार व इतर संघटनांनी लाकूड उपलब्ध करून दिले. यामुळे नातेवाईकांच्यावरील आर्थिक भार काहीअंशी कमी झाला.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
मनपा प्रशासनाने नेरी नाका स्मशानभूमी ही कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवली होती. तसेच या ठिकाणी येणाऱ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने आरोग्य विभागातील दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी केली होती. अंत्यसंस्कारावेळी कोरोनाची लागण इतरांना होऊ नये यासाठी महापालिकेचे कर्मचारी पीपीई कीट घालून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत होते. यासह स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवरदेखील ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.
कोट..
कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेने अंत्यसंस्कारावेळी सर्व खर्च केला होता. मात्र दुसऱ्या लाटेत ही जबाबदारी मृतांच्या नातेवाईकांवरच सोपविण्यात आली होती.
- पवन पाटील, सहायक आयुक्त, मनपा