उपचार मिळत नसल्याने नातेवाइकांनी मांडल्या आमदारांकडे व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:19 AM2021-08-12T04:19:28+5:302021-08-12T04:19:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ढालगाव, ता. जामनेर येथे हाणामारीत जखमी झालेल्या प्रौढास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तक्रारीनंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ढालगाव, ता. जामनेर येथे हाणामारीत जखमी झालेल्या प्रौढास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तक्रारीनंतर उपचार मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला कोणतेही उपचार होत नव्हते, शिवाय त्रास असतानाही रुग्णाला घरीच नेण्याबाबत डॉक्टरांकडून दबाव येत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे व्यथा मांडल्या.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. ते बाहेर आल्यानंतर ढालगाव येथील रुग्णाच्या नातेवाइकांनी त्यांची भेट घेतली. शेतीच्या वादातून मारहाण झाल्यानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रुग्णालयात आणले, मात्र, मंगळवारीच सर्व रिपोर्ट चांगले असून रुग्णाला घेऊन जा असे डॉक्टर वारंवार सांगत होते. मात्र, रुग्णाला त्रास होत असतानाही डॉक्टरांकडून दबाव वाढत होता. जर तुम्ही गेले नाहीत तर तुम्हाला बाहेर काढू अशा प्रकारची धमकीही कर्मचाऱ्यांनी दिल्याचे नातेवाइकांनी सांगितले. अखेर आम्ही तक्रार अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मग उपचार सुरळीत सुरू झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे होते. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही डॉक्टरांना याबाबत सूचना दिल्या व रुग्णांकडे लक्ष देण्यासंदर्भात सांगितले.