परराज्यातून आणलेल्या ६७ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:17 PM2019-06-16T12:17:16+5:302019-06-16T12:17:53+5:30
तीन जणांवर गुन्हा ; पाच जनावरांचा मृत्यू
जळगाव : परराज्यातून आणलेल्या ६७ जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री वरणगावात सुटका केली. या पशुधनाला कोंबलेले असल्याने पाच जनावरे मृत झालेली आढळून आली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख वसीम शेख यासीन, बशीर कुरेशी उर्फ चढ्ढा (रा.वरणगाव, ता.भुसावळ) व ट्रक मालक शेर मोहम्मद जाकीर हुसेन (रा.बेरजाली, महिदपुर जि.उज्जैन, मध्य प्रदेश, ह.मु.धुळे) या तीन जणांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव येथे ट्रक भरुन जनावरे आणण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना मिळाली होती.
त्यानुसार उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम, सहायक निरीक्षक सागर शिंपी, सारिका कोडापे, अनिल इंगळे, रवींद्र गिरासे, सुनील दामोदरे, दत्तात्रय बडगुजर, रवींद्र चौधरी, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे व किरण चौधरी यांचे पथक शुक्रवारी रात्री वरणगावला रवाना केले होते. या पथकाने इमाम कॉलनी भागात जावून ट्रकला घेरले, मात्र पोलीस वाहन पाहताच चार चाकी वाहनातून संशयित पसार झाले. त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले.
क्रुरतेने कोंबले जनावरे
पोलिसांनी ट्रक (क्र.एम.एच.१८ बी.जी.०३१५) ताब्यात घेतला. त्यात अतिशय क्रुरतेने जनावरे कोंबून भरलेली होती. लहान मोठे असे ६७ जनावरे त्यात होती. दरम्यान, प्रवासात ५ जनावरांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयितांविरुध्द महाराष्टÑ प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सन २०१५ सुधारीत) चे कलम ५,५ (अ), ५ (ब), ९,११ प्राण्यांना निर्दयनतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (ड),(ई), (फ) मोटार वाहन कायदा कलम १८३(१),(२),(अ), १७९, १७७ व कलम ४२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.