मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे विश्वसनीय साधन : महानुभाव साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:34 AM2018-07-07T01:34:09+5:302018-07-07T01:35:01+5:30

शासकीय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त प्राचार्य आणि अभ्यासक प्रा.विनायक त्र्यंबक पाटील हे ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘खान्देश आणि महानुभाव’ या विषयावरील लेखमाला लिहिणार आहेत. आजच्या पहिल्या भागात त्यांनी महानुभाव साहित्याबद्दलची काही विशेष माहिती आणि महत्त्वाच्या ग्रंथांबद्दल लिहिले आहे.

 Reliable means of history of medieval Maharashtra: Mahanubhipa Sahitya | मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे विश्वसनीय साधन : महानुभाव साहित्य

मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे विश्वसनीय साधन : महानुभाव साहित्य

Next

महाराष्ट्रातील सर्वांनी महानुभाव साहित्याचा अभ्यास करावा, असे मला वाटते. त्यासंबंधी थोडक्यात विवेचन सादर करीत आहे. त्यामुळे दोन-चार संशोधक जरी या कार्याला प्रवृत्त झाले तर ती आनंदाची बाब ठरावी. त्याची थोडक्यात कारणे.
अंदाजे शके ११६० पासून ते आजपर्यंत मध्ययुगीन महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक आणि भाषिक इतिहास महानुभाव ग्रंथकर्त्यांनी आपणाला उपलब्ध करून दिलेला आहे. या इतिहासाचे लेखन सांकेतिक लिपित असल्यामुळे यात छेडछाडीला अजिबात संधी मिळालेली नाही. मध्ययुगाच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक विश्वसनीय साधन म्हणून महानुभाव साहित्य उपयुक्त आहे.
जैन, शीख आणि बौद्ध धर्मियांच्याप्रमाणे स्वामी चक्रधर यांच्यापासून धर्म तत्त्वज्ञान सांगण्यासाठी मराठी आणि प्रादेशिक बोली भाषेचा वापर केलेला आहे. तत्त्वज्ञान आणि धर्म दर्शन यांच्या अभ्यासकासाठी एक उपयुक्त बैठक प्राप्त करून दिलेली आहे. तत्त्वज्ञान आणि दर्शन शास्त्राच्या विवेचनासाठी स्थानिक भाषेचा वापर केल्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी ज्ञानाचे दालन खुले करून दिलेले आहे.
मराठी भाषेतील आद्य चरित्र गद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ हा आहे. त्याचप्रमाणे आद्य काव्याचे लेखनसुद्धा महानुभाव पंथीयांनी आपणाला दिलेले आहे. लीळाचरित्राचे लेखन म्हाईम भट्ट या पंडिताने केलेले आहे आणि काव्य म्हाईसादाने केलेले आहे. म्हाईदासाचे धवळे म्हणून हे काव्य सर्वमान्य झाले आहे. लीळाचरित्राचा अभ्यास केल्यास, स्वामी चक्रधर यांनी अनिष्ठ रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धा याविरुद्ध स्वत:च्या उदाहरणाने लढा उभारलेला होता. जातीव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विटाळ (अनिष्ठ रुढी), अस्पृश्यता (परंपरा), जाती व्यवस्था याविरुद्ध असंख्य उदाहरणे लीळाचरित्रात आढळतात. व्यक्ती आणि समाज जीवन निर्मळ, स्वच्छ आणि चारित्र्यसंपन्न असावे म्हणून आचार्य, शिष्य, भिक्षू, वासनिक आणि गृहस्थ या सर्व वर्गांसाठी आचार धर्माची निर्मिती केलेली आहे आणि हा आचार धर्म लिखित स्वरुपात आहे.
स्वामी चक्रधरांपासून गुरु-शिष्य परंपरा आणि परिवाराची नोंद केलेली असून, लिखित स्वरुपात उपलब्ध आहे. नागदेवाचार्य या प्रथम आचार्यापासून पुढील आचार्य आणि तद्नंतर निर्माण आग्नाय (शाखा) आणि सर्व उपशाखा यांची लिखित माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे विविध शाखांमधील विद्वान पंडित शास्त्री यांनी केलेल्या कार्याची आणि ग्रंथनिर्मितीची कालानुक्रमे नोंद केलेले ग्रंथ चरित्र आबाब म्हणून उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे स्त्री महंत आणि त्यांचे पुरुष शिष्य किंवा स्त्रियांना गुरू म्हणून पंथीथ मंडळीने अगदी सुरुवातीपासून स्वीकारलेले आहे. स्त्रियांना व्यक्ती म्हणून भक्ती आणि मुक्तीसाठी पात्र समजलेले आहे. प्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य नंतर कमळा उसा उपाध्ये व हिराईसा यांना आचार्याचा दर्जा दिलेला दिसून येतो. परकीय आक्रमण झाल्यावर समाजाची झालेली वाताहत आणि स्थित्यंतराचा इतिहास नावानिशी नोंदवलेला आहे. त्यातही आपल्या धर्मरक्षणासाठी केलेले प्रयत्न नमूद केलेले आहेत.
श्रीमद् भगवत गीता या ग्रंथावरील असंख्य टीका संस्कृत आणि मराठीत महानुभाव पंथीयांनी लिहिलेल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे महानुभाव पंथीय पंडितांनी मराठी भाषेच्या विकासासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. सांकेतिक लिपी, व्याकरण ग्रंथ, गद्य-पद्य लेखन, तत्त्वज्ञानविषयक वैचारिक लेखन, शब्दकोष, निबंध, संशोधनपर भाष्यग्रंथ, खंडकाव्य, समीक्षा आणि रसग्रहण या सर्व वाङ्मय प्रकारात लेखन केलेले आहे. या उपरोक्त कारणांसाठी महाराष्ट्राने आणि मराठी भाषिक जनतेने महानुभाव साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महानुभाव पंथात उपयोगात असणारे ग्रंथ देत आहे.
१) लीळाचरित्र, २) ऋद्धिपूर चरित्र, ३) स्मृतीस्थळ, ४) सूत्रपाठ व दृष्टांत पाठ, ५) तिन्ही स्थळे, ६) लक्षण बंद , ७) विचार बंद, ८) आचार बंद, ९) मालिका महाभाष्य, १०) दृष्टांत स्थळ, ११) दृष्टांत बंद, १२) मूर्ती प्रकाश, १३) रुख्मिणी स्वयंवर, १४) उद्धवगीता, १५) वच्छाहरण, १६) सह्यादी वर्णन, १७) ज्ञान प्रबोध, १८) ऋद्धिपूर वर्णन.

- प्रा.विनायक त्र्यंबक पाटील

Web Title:  Reliable means of history of medieval Maharashtra: Mahanubhipa Sahitya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.