धार्मिक स्थळे बंदच, चार भींतीत साजरा करा आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 09:14 PM2020-08-04T21:14:08+5:302020-08-04T21:14:19+5:30
पोलीस अधीक्षक : हिंदुत्वसवादी संघटना व पक्षाची बैठक
जळगाव : लॉकडाऊनसंदर्भात अगदी सुरुवातीला दिलेले काही आदेश आजही कायम असून त्यानुसार सर्वच धार्मिकस्थळे बंदच आहेत, त्यामुळे राम मंदिर भूमीपुजन सोहळ्याचा आनंद हा मंदिरात किंवा सार्वजिनक जागी, चौकात करता येणार नाही, तो चार भींतीच्या आतच करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
आयोध्या येथे आज (बुधवार) पंतप्रधानांच्या हस्त राम मंदिराचा भूमीपुजन सोहळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी प्रेरणा सभागृहात हिंदुत्ववादी संघटना, पक्ष व इतर कार्यकर्ते व शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांमधून कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती घेण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली.
खासगी जागेची व्याख्या केली स्पष्ट
पोलीस अधीक्षक म्हणाले, आनंदावर विरजन घालण्याचा प्रशासनाचा अजिबात हेतू नाही,कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये अशी अपेक्षा व्यक्त करताना खासगी जागेची याख्या स्पष्ट करताना, आपली इमारत किंवा मोकळे खासगी मैदान असले तरी बाहेरील व्यक्तींची दृष्टी ज्या ठिकाणी पडते, ती जागा खासगीच्या व्याख्येत येत नाही. चार भिंतीत, सभागृह ही जागा खासगीत येते.कायद्याचे पालन करुनच मोजक्याच चार ते पाच लोकांमध्ये उत्सव साजरा करा. घरासमोर रांगोळी, घराला तोरण व गोड नैवद्य असे उपक्रम राबविण्याचे आवाहन डॉ.पंजाबराव उगले यांनी केले.
सोशल मीडियाबाबत तक्रारी
सोशल मीडियावर प्रसारीत होत असलेल्या वेगवेगळ्या संदेशाबाबत पोलिसांनी दखल घ्यावी असा सूर यावेळी उपस्थितांमधून निघाला. भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, रवींद्र नेरपगारे, दीपक जोशी व दीपक साखरे यांनी काही सूचना मांडून नियोजनाची रुपरेषा सांगितली. सोशल मीडियावर पोलिसांची कडक नजर असून तेढ निर्माण करणारा किंवा धार्मिक भावना भडकविणारे संदेश प्रसारीत करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.