कोरोनाच्या काळात मिळाले मुलांच्या धार्मिक संस्काराला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:19 AM2021-09-22T04:19:27+5:302021-09-22T04:19:27+5:30
(डमी १२०६) अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. काही शाळांनी ...
(डमी १२०६)
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केले असले तरी शाळा पूर्वी प्रमाणे पुर्ण वेळ नसल्याने विद्यार्थ्यांचा पुरेपुर वेळ हा घरातच जात आहे. पालकांसह आजी-आजोबांच्या सानिध्यात मुलांचा वेळ जात असून, या वेळेचा सदुपयोग करून, मुलांमध्ये धार्मिक संस्कार रुजविण्यावर पालकांचा भर दिसून येत आहे. आजच्या काळात मुलं धार्मिक संस्कारापासून दुर असल्याच्या चर्चा सुरु असताना, दूसरीकडे कोरोनामुळे मिळालेल्या वेळेत मुलांमध्ये धार्मिक संस्काराची शिदोरी रुजविण्यावर पालकांकडून पुरेपुर वेळ दिलेला दिसून येत आहे.
प्रत्येक धर्मात संस्काराचे धडे
हिंदु धर्म
सकाळी लवकर उठण्यापासून सकाळी देवांची पुजा करणे, घरातील ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून त्यांच्याकडून आशिर्वाद घेण्याची सवय पालकांकडून लावली जात आहे. यासह सायंकाळची आरती, विविध स्त्रोत्र, अभंग, भावगीत व गोष्टींच्या माध्यमातून महाभारत, रामायणातील संस्काराची बाबी मुलांपर्यंत पोहचवण्याचे काम या कोरोनाकाळात पालकांकडून देण्यात आले आहे.
मुस्लीम धर्म
कोरोनामुळे रमजानच्या काळात मसजिद मध्ये किंवा इदगाह वर जावून नमाज पठणास परवानगी नव्हती. त्यामुळे सर्वच पध्दती या घरीच झाल्या. नमाज असो वा सेहरी हे घरीच झाल्यामुळे पालक कशा प्रकारे हे विधी पार करतात हे मुलांनी पाहिले. तेच संस्कार मुलांना शिकायला मिळाले. कोरोनामुळे अनेकांचे नुकसान झाले असले तरी काही गोष्टी या काळात मुलांसाठी चांगल्या देखील झाल्या.
ख्रिश्चन धर्म
परमेश्वराबद्दल व आपल्या सहकाऱ्याबद्दल प्रेम बाळगून जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती मनुष्य प्रयत्न करतो, म्हणजेच ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती व्यक्ती प्रयत्न करतो. हेच संस्कार मुलांमध्ये रुजविण्यासाठी कोरोना काळात पालकांना आपल्या पाल्यांसाठी चांगला वेळ देता आला.
कोट..
आजच्या आधुनिक काळात जीवन जगण्यासाठी धार्मिक संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. शाळेत असताना पालक आपल्या पाल्यांना पुरेसा वेळ देवू शकत नव्हते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात पालकांनी आपल्या पाल्यांना पुरेसा वेळ दिला. यामध्ये चांगले धार्मिक संस्कार मुलांना देता आले.
-स्वप्नील जोशी, विठ्ठल मंदिर संस्थान, आव्हाणे
मुलांमध्ये आधुनिक शिक्षणासोबत धार्मिक संस्कार देखील महत्वाचे आहेत. जीवन कसे जगायचे हे धर्म शिकवतो, कोरोनाकाळात पालकांनी घरात राहूनच नमाज पठण केले. वडिलांचे हेच धार्मिक संस्कार मुलांमध्ये देखील रुजले. कारण अनेकदा मुल ही शाळेच्या कारणामुळे मशीदमध्ये जावू शकली नव्हती. त्यामुळे काही धार्मिक बाबींपासून मुल अलिप्त होती, ती या कारणामुळे जवळ आली.
-अयाज अली नियाजअली, अध्यक्ष, सुन्नी ईदगाह ट्रस्ट
येशु ख्रिस्तांनी दिलेला मानवतेचा संदेश आजच्या काळात महत्वाचा आहे. तो संस्कार आजच्या पीढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.आजच्या स्पर्धेच्या युगात हेच संस्कार मुलांपर्यंत पोहचण्यास वेळ मिळत नव्हता. मात्र, कोरोनाच्या आपत्तीत कुंटूंब एकत्र आले. या एकीकरणातून धार्मिक संस्कार देखील मुलांपर्यंत पोहचू शकले.
-जोसेफ मेरी, जळगाव.