रेमडेसिविरची २६ हजार रुपयात काळ्या बाजारात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:18 AM2021-04-23T04:18:25+5:302021-04-23T04:18:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात २६ हजार रुपयात विक्री करणाऱ्या टोळीचा सहायक पोलीस अधीक्षक कुमार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात २६ हजार रुपयात विक्री करणाऱ्या टोळीचा सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी गुरुवारी पर्दाफाश केला. पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून पाच इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.
भास्कर मार्केट, रामानंदनगर, पांडे चौक, स्वातंत्र्य चौक यासह इतर ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांना बोलावून या इंजेक्शनची विक्री केली जात होती.
रेमडेसिविर इंजेक्शनची शासकीय किंमत १२०० रुपये असतांना तब्बल २६ हजार रुपयांत विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गेल्या पाच दिवसांसून सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व त्यांच्या पथकाने नजर ठेवून गुरुवारी दुपारी भास्कर मार्केटमध्ये टोळीचा पर्दाफाश केला. प्रारंभी येथून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याजवळ तीन इंजेक्शन मिळून आले. त्यानंतर वेगवेगळ्या भागातून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चौकशीत आणखी सहा जणांची नावे उघड झाली. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.