रेमडेसिविर, ऑक्सिजनचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:16 AM2021-04-22T04:16:04+5:302021-04-22T04:16:04+5:30
समता सैनिक दलाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या जिल्ह्यात रेमडेसिविर व ऑक्सिजनचा तुटवडा भासत ...
समता सैनिक दलाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या जिल्ह्यात रेमडेसिविर व ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. परिणामी, अनेक बाधितांची प्रकृती ही चिंताजनक झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर रेमडेसिविर व ऑक्सिजनचा रुग्णालयांना पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, तीन दिवसात पुरवठा सुरळीत न झाल्यास २३ एप्रिल रोजी आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.
सद्यस्थितीला बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर उपलब्ध होत नाही. दोनशे, पाचशे रुपये अधिक देऊन रेमडेसिविर उपलब्ध होत होते. पण, आता काही जण पंधरा ते वीस हजार रुपयात ते विक्री करीत आहेत. रेमडेसिविर व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील डॉक्टर व मेडिकलधारक हवालदिल झाले आहे. दुसरीकडे त्यांच्याबाबत सर्वसामान्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे तीन दिवसात ज्या रुग्णालयांना रेमडेसिविर व ऑक्सिजनची आवश्यकता आहे. तेथे तत्काळ पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास २३ एप्रिल रोजी समता सैनिक दलाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय निकम, जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा सचिव भाईदास गोलाईत, जिल्हा कोषाध्यक्ष सचिन शिरसाठ यांनी दिला आहे.