मनपा निधीतून रेमेडेसिविर इंजेक्शन मागवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:14 AM2021-04-17T04:14:58+5:302021-04-17T04:14:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शहरातील गंभीर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शहरातील गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना रेमेडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण फिरावे लागत आहे. अनेक लोक जास्त दराने इंजेक्शन खरेदी करीत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी जळगाव मनपाने मनपा निधीतून रेमेडेसिविर इंजेक्शन खरेदी करावे अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेविका भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालये फुल झाली असून रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने फिरफिर करावी लागत आहे. जळगावात दररोज अनेक गंभीर रुग्ण समोर येत असून त्यांना रेमेडेसिविर इंजेक्शनची गरज भासत आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक रेमेडेसिविरसाठी वणवण फिरत आहे. जिल्हा प्रशासनाने रेमेडेसिविरसाठी नियोजन केले असले तरी नागरिकांना आवश्यकता असताना इंजेक्शन उपलब्ध होत नाही. मुंबई मनपाने या इंजेक्शन खरेदीसाठी प्रक्रिया सुरू केली असून त्यादृष्टीने नियोजन देखील करण्यात आले आहे. जळगाव शहरवासियांचा विचार करता मनपाने देखील मनपा निधीतून हे इंजेक्शनची खरेदी करावी. गेल्या वर्षी देखील मनपा निधीतून अँटीजन टेस्ट किट खरेदी करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे रेमेडेसिविरची खरेदी करावी अशी मागणी माजी महापौर भारती सोनवणे यांनी केली आहे.
नगरसेवकांनी मानधन द्यावे
रेमेडेसिविर इंजेक्शन खरेदीसाठी भारती सोनवणे आणि नगरसेवक कैलास सोनवणे हे देखील आपले मानधन मनपाला देण्यास तयार आहे. त्याचप्रमाणे मनपातील जे विद्यमान सदस्य आपले १ महिन्याचे मानधन रेमेडेसिविर इंजेक्शन खरेदीसाठी देण्यास तयार असतील त्यांच्याशी देखील आपण चर्चा करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.