पाणीटंचाईवर तूर्त उपाय : दोन दिवसांपासून दिवसातून येताहेत चार टँकर, गावातील विहिरी आटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:08 AM2018-05-21T00:08:40+5:302018-05-21T00:08:40+5:30
तमगव्हाण येथे टंँकरने पाणीपुरवठा
आॅनलाईन लोकमत
तमगव्हाण, ता.चाळीसगाव (जि.जळगाव), दि. २१ : तमगव्हाण येथे पाणीटंचाई निवारणार्थ १९ पासून टँकर सुरू करण्यात आले आहे. टँकरचे पाणी गावविहिरीत टाकले जाते. नंतर ग्रामस्थ ते पाणी काढतात.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पाणी नसल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पाणीटंचाई निवारण करण्यासाठी ग्रामपंचायतीने तालुका प्रशासनाला टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार १९ मेपासून तमगव्हाण गावाला टँकर मंजूर करून ते प्रत्यक्षात सुरूही करण्यात आले आहे.
गावाला दररोज टँकरच्या चार खेपा म्हणजे ४८ हजार लीटर पाणी टँकरद्वारे पुरवठा करण्यात येणार आहे.
टँकर गावात आल्याने टँकरचे पूजन व टँकरचालक धनराज जाधव यांचा सत्कार ग्रामपंचायतीतर्फ सरपंच शिवदास पाटील यांनी केला. या वेळी उपसरंपच दिनकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य मुकुंदा पाटील, मधुकर पाटील, राजेंद्र पाटील, याशिवाय सुभाष पाटील, बाजीराव पाटील आदींसह ग्रामस्य उपस्थित होते. गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
तमगव्हाण येथे पाण्याचे टँकर सुरु करुन तालुका पंचायत समितीने तात्पुरता उपाय केला असला तरी आगामी काळात कायम स्वरुपी उपाय योजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गावातील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी गावातील नागरिकांनीच आता पुढाकार घ्यावा, यासाठी जलयुक्त शिवारसारखे प्रयोग राबविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.