भुसावळकरांनी जपला आठवणींचा ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:34 PM2018-04-14T13:34:28+5:302018-04-14T13:34:28+5:30
डी.एस. हायस्कूलच्या मैदानावर झाली होती सभा
पंढरीनाथ गवळी / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ -भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भुसावळ व तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे दिलेल्या भेटीच्या स्मृती-आठवणी आजही त्यांच्या अनुयासह भुसावळकरांमध्ये ताज्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेकर यांचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवानंतरचे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे त्यांच्या भुसावळ येथील भेटीला विशेष महत्त्व आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९५२ मध्ये भुसावळात आले होते व त्यांची डी. एस.हायस्कूलच्या प्रांगणावर जाहीर सभा झाली होती, अशी आठवण जुने लोक सांगतात. बाबासाहेबांचे दिल्लीहून भुसावळात रेल्वेने आगमन झाले. त्यांच्यासोबत त्यांची ग्रंथसंपदा असलेली पेटी होती. ती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती, अशी आठवण काही वर्षापूर्वी स्व. एन. डी. खरात यांनी ‘लोकमत’ला सांगितली होती. बाबासाहेबांसोबत दादासाहेब रुपवते आदी विभुती होत्या, असेही त्यांनी सांगितले होते.
सभेच्या आधी त्यांनी तापी रोडवरील (यावल रोड) विश्रामगृहात विश्रांती घेतली होती. यानंतर ते रेल्वे चाळीतील यंग मेन्स असोसिएशनच्या सार्वजनिक वाचनालयात आले त्यांनी वाचनालयाची पाहणी केली. त्यावेळी कांबळे नावाचे खानसामा होते. स्वयंपाक करण्यात ते तरबेज होते. जेवण घेतल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांचे कौतुक केले व शाबासकी दिल्याचीही आठवण सांगितली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चाळीसगावला आले होते. दादासाहेब गायकवाड, शांताबाई दाणी, पी. जे. रोहम,अण्णासाहेब लयंकर अशा सत्यग्रहींना धुळे येथे अटक करण्यात आली होते त्यांना सोडविण्यासाठी बाबासाहेब आले होते. त्यावेळी त्यांची चाळीसगावला सभा झाली होती. माजी मंत्री डी.डी.चव्हाण यांचे वडील दिवाण सीताराम चव्हाण यांनी सभेचे आयोजन केले होते. चाळीसगाव येथे श्यामराव कामाजी जाधव या न शिकलेल्या तरुणावर बाबासाहेबांचा लोभ होता. ते त्याला नावानिशी ओळखत होते, अशीही आठवण सांगितली जाते. चाळीसगाव रेल्वेस्थानक पूर्वी अगदी लहान होते. त्याठिकाणी बाबासाहेब रेल्वेने उतरले व जवळच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या थांबण्याची सोय करण्यात आली होती. बाबासाहेब फैजपूर,ता.यावल येथेही येऊन गेल्याची आठवण सांगितली जाते.