जामठी येथील बौद्ध समाज स्मशानभूमीचे अतिक्रमण काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:27 PM2020-09-23T17:27:45+5:302020-09-23T17:31:39+5:30
जामठी येथील बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे
बोदवड : जामठी येथील बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी भारतीय बहुजन महासंघाने केली आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी प्रशासनाला देण्यात आले.
जामठी येथे बौद्ध समाज बांधवांच्या स्मशानभूमीच्या जागेवर गेल्या चार दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यासाठी समाज बांधव गेले होते. गट क्र १३/४ च्या जागेवरून शेतकरी व समाज बांधव यांच्यात वाद झाला होता. हा वाद पोलिसांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता.
याबाबत भारतीय बहुजन महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, महासचिव दिनेश इखाटे, अॅड.विनोद इंगळे, तालुकाध्यक्ष सुपडा निकम, महेंद्र सुरळकर, नागसेन सुरळकर, गोपीचंद सुरवाडे यांच्यासह समाजबांधवानी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना निवेदन दिले. या जागेवर असलेले अतिक्रमण काढावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गट क्र. १३/४च्या पोटखराब जागेवर समाजाची स्मशानभूमी पूर्वीपासून आहे. या जागेवर समाज बांधव अंत्यसंस्कार करतात. मात्र आता या जागेवर काटेरी कुंपण करण्यात आले असून, ते अतिक्रमण काढण्यात यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.