अपंग अनुशेषासाठी सुधारित जाहिरात काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:58 AM2019-08-23T11:58:01+5:302019-08-23T11:58:47+5:30
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये दिव्यांगांना नियमानुसार ४ टक्के आरक्षण न ठेवल्याने या संदर्भात सक्षम न्यायाधिकारी ...
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये दिव्यांगांना नियमानुसार ४ टक्के आरक्षण न ठेवल्याने या संदर्भात सक्षम न्यायाधिकारी तथा दिव्यांग कल्याण न्यायाधिकरणाच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याची दखल घेत दिव्यांग कल्याण न्यायाधिकरणाच्या आयुक्तांनी सुधारीत जाहिरात काढण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले आहे.
जिल्हा बँकेच्यावतीने कारकून या पदासाठी २२० पदांची भरती करण्यात येणार असून त्यासाठी १ आॅगस्ट २०१९ रोजी बँकेच्यावतीने जाहिरात काढण्यात आली. मात्र यामध्ये दिव्यांगांसाठी असलेले ४ टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले नाही.
या संदर्भात ठाणे येथील प्रहार अपंग क्रांती संस्थेच्यावतीने सक्षम न्यायाधिकारी तथा दिव्यांग कल्याण न्यायाधिकरणाच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्यात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६मधील कलम ३४ (१)नुसार दिव्यांगाकरिता सरकारी नोकर भरतीमध्ये ४ टक्के आरक्षण असताना जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने सदर नोकर भरतीसाठी ४ टक्के आरक्षणच ठेवलेले नाही.
या तक्रारीची दखल घेत सक्षम न्यायाधिकारी तथा दिव्यांग कल्याण न्यायाधिकरणाच्या आयुक्तांनी जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना पत्र देऊन अपंगांचा अनुशेष भरण्याच्या दृष्टीने तत्काळ सुधारीत जाहिरात काढावी, असे आदेश दिले आहे.
या आदेशाची प्रत राज्याच्या सहकार आयुक्तांना देण्यात आली आहे.
दरम्यान, ही भरती करताना त्यावर सहकार सचिवांचे नियंत्रण असते. त्यांच्या सूचनेनुसारच जाहिरात काढण्यात आल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे आता बँकेचे कार्यकारी संचालक निर्णय घेतात की सहकार सचिवांकडून नवीन आदेश येतात, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.