शहरातील सर्व बाजारपेठेतील भाजीपाला विक्रेत्यांना हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:34+5:302021-04-17T04:15:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील सर्व बाजारपेठ परिसरासह उपनगरांमध्ये भरणाऱ्या बाजारांमधील विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील सर्व बाजारपेठ परिसरासह उपनगरांमध्ये भरणाऱ्या बाजारांमधील विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजेनंतर मनपाचा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने वेगवेगळ्या भागात एकाच वेळी कारवाया केल्या. यामध्ये १०० हून अधिक विक्रेत्यांचा माल देखील जप्त करण्यात आला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात महापालिकेच्या पथकाकडून नियमित पाहणी होत असल्याने या भागात व्यवसाय करण्यासाठी अनेक भाजीपाला विक्रेते दचकतात मात्र गणेश कॉलनी चौक, बजरंग बोगदा परिसर, मास्टर कॉलनी, काशीबाई उखाजी कोल्हे शाळा परिसर या भागात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटत लहान बाजारच भरवले आहेत. याबाबत अनेक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी मुख्य बाजारपेठ परिसर व्यतिरिक्त शहरातील उपनगरांमध्ये भरणाऱ्या या बाजारांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. काशीबाई उखाजी शाळा परिसरात ५० ते ६० विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत मनपाच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर या भागात जाऊन भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासह अनेक विक्रेत्यांना समज देखील देण्यात आली.
महापालिकेकडून वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती
महापालिकेच्या पथकाकडून शहरात दररोज कारवाई मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर देखील शहरातील अनेक भागांमध्ये भाजीपाला विक्रीसह इतर विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच या बाजारांमध्ये सोशल डिस्टंसिंग चे पालन देखील होत नसल्याने कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने पसरत आहे. त्यातच मुस्लिम बांधवांचा रमजान महिना देखील सुरू झाल्यामुळे बाजारात दुकाने बंद असतानाही खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी देखील होत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व लपून-छपून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन विभागात २० अतिरिक्त कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून देखील वर्ग दोनच्या अधिकाऱ्याची नियुक्ती यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.