अतिक्रमण काढल्याने रस्ता झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:27 AM2019-09-06T00:27:03+5:302019-09-06T00:27:09+5:30
अमळनेर : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे घेतला निर्णय, दगडी दरवाजाच्या सुरक्षेवर लक्ष
अमळनेर : दगडी दरवाजाकडील वाहतूक धोक्याची झाल्याने गणपती विसर्जन करण्यास अतिक्रमण अडथळा ठरत होते. त्यामुळे तहसीलदार, पोलीस प्रशासन व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने गांधलीपुरा पुलकडे जाणारा मार्ग व सुभाष चौक ते बालेमिया मशिदीपर्यंतच्या रस्त्याचे अतिक्रमण ५ रोजी काढण्यात आले.
गेल्या काही दिवसांपूर्वी भिजपावसामुळे ऐतिहासिक दगडी दरवाजाचा बुरुज कोसळल्याने धुळे-चोपडा राज्य मार्गावरून दरवाजाकडून होणारी वाहतूक धोक्याची असून पुरातत्व विभागाने वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचे पत्रही दिले आहे. त्यामुळे ही वाहतूक सुभाष चौक व गांधलीपुरा पुलाकडून वळवणे अनिवार्य होते. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अनेक मंडळांची आरती दगडी दरवाजाजवळ होत असल्याने बँड, ढोल, ताशे वाजवणेदेखील जोखमीचे असून मिरवणूक मार्ग बदलणे गरजेचे असल्याचा मुद्दा शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता. त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला. नगरपालिका पथक व जेसीबी मशीन घेऊन गांधलीपुरा भागातील पुलाकडे जाणा-या मार्गावरील ५ ते 6 घरे, एक सामाजिक मंदिर, झोपड्या आदी अतिक्रमण काढून टाकण्यात आले. या कारवाईमुळे येथील रस्ता मोकळा झाला आहे.
उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, संजय चौधरी, युवराज चव्हाण, संतोष बि-हाडे, राधेश्याम अग्रवाल, नगरालिका व पोलीस कर्मचारी शरद पाटिल, हितेश चिंचोरे, दीपक माळी, तलाठी पुरुषोत्तम पाटील, स्वप्नील कुलकर्णी, हर्ष मोरे, प्रथमेश पिंगळे, ोलीस पाटील भागवत पाटील यांचे सहकार्य लाभले.