जळगावात मालकी बदललेल्या 6 रस्त्यांवरील 45 दारु दुकानांचे होणार नूतनीकरण
By admin | Published: April 7, 2017 03:19 PM2017-04-07T15:19:10+5:302017-04-07T15:19:10+5:30
सात दिवस दुकाने बंद राहिल्यानंतर हे आदेश प्राप्त झाले असून येत्या एक- दोन दिवसात ही दुकाने सुरू होऊ शकतात.
जळगाव : रस्त्याची मालकी बदलल्याने मनपाच्या ताब्यात आलेल्या शहरातील सहा रस्त्यांवरील 45 दारूदुकानांच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यात यावे, असे आदेश प्राप्त झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली. सात दिवस दुकाने बंद राहिल्यानंतर हे आदेश प्राप्त झाले असून येत्या एक- दोन दिवसात ही दुकाने सुरू होऊ शकतात.
महामार्ग व राज्यमार्गावरील दारूची दुकाने, परमीट रुम, बियर बार 1 एप्रिलपासून बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. असे असताना जळगाव परिसरातील सहा रस्त्यांची मालकी बदलण्यात येऊन हे रस्ते मनपाकडे सोपविण्यात आले व त्यांना एक प्रकारे वाचविण्यात आल्याचा आरोप होऊ लागला. या सहा रस्त्यांवर 45 दारू दुकाने असून सध्या ती बंद आहे. ती सुरू करण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश प्राप्त झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या परवान्याचे एक-दोन दिवसात नूतनीकरण करण्यात येणार आहे. केवळ जळगावच नव्हे तर राज्यभरासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
220 मीटरच्या बाहेर 16 परवाना धारक
20 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात आता 220 मीटरच्या बाहेर असलेली दारू दुकाने सुरू राहू शकतात, असा शासनाने आदेश काढला आहे. जिल्ह्यात असे 16 परवानाधारक असून त्यांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिका:यांकडून त्याविषयी निर्देश आले की, जिल्ह्यात आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
1 एप्रिलपासून 606 दारू दुकानांचे व्यवहार बंद करण्यासह 140 परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मनपा हद्दीत आलेल्या सहा रस्त्यांवर 45 दारु दुकानांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. 2 दिवसात पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-एस.एल. आढाव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.